डोंबिवली ग्रामीण भागात भाताच्या लावणी सुरुवात

 


चांगल्या पावसामुळे शेतकरी सुखावले 

डोंबिवली ( शंकर जाधव ) राज्यासह ठाणे जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असल्याने जिल्ह्यातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. ठाणे लागत असलेल्या डोंबिवली शहराच्या चारही दिशांना पूर्वी मोठ्या प्रमाणात भातशेती होत होती. आता मात्र थोड्याच प्रमाणात शेती केली जाते. ही शेती परंपरागत आणि जोडीला आवड म्हणून केली जाते. शहराच्या बाजूस असणाऱ्या ग्रामीण पट्ट्यात हे दृश्य पहावयास मिळते. या आठवड्यात पावसाचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांनी शेतीच्या लावणी सुरुवात केली आहे.

दरवर्षीप्रमाणे शेतकरी आपली शेतीकरण्यास मोठ्या आनंदाने पेरणी नांगरणी करण्यास सुरुवात केली मध्यंतरी पाऊस थोडा -थोडा पडत असल्याने शेतकऱ्यांना शेती करण्यात दिलासा मिळत नव्हता काही दिवस तर पाऊस निघून गेला अशा वेळी शेतकरी खूप हलाविल झाला होता पिकांचे आता नुकसान होईल या भीतीने शेतकरी चिंतेत होता. परंतु पावसाने चांगली हजेरी लावल्याने तसेच भरपूर दिवसाने पावसाचे आगमन झाले आणि शेतकरी आनंदाने आपली शेती लावण्यात दंग झाला असून आपली शेती करण्यास सुरुवात केली आहे.

डोंबिवली जवळील कावळ्यांचे गांव म्हणून परिचित असलेल्या उंबार्ली गावातील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला सुरुवात केली आहे. येथील शेतकरी सुखदेव पाटील सांगतात की, पूर्वी आमचा सर्व परिवार शेतीच्या कामासाठी शेतात उतरत असे. तेव्हा कुटुंब मोठे होते, एकत्र होते. आता कुटुंबातील माणसे शेतीच्या कामासाठी उतरत नाहीत. उच्च शिक्षित होऊन इतर ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने बाहेर आहेत, काहींनी इतर व्यवसायात उडी घेतली आहे. पण आज आमचं कुटुंब पारंपरिक शेती आहे म्हणून थोड्या प्रमाणात शेती करतो. पूर्वी चार-चार ट्रक भात निघत होते. आता घरापूरते आणि नातेवाईक यांना देण्यापूरते भात होते. पण हे करण्यासाठी मजूर माणसे आम्ही इगतपुरीहुन आणतो. गडी-बाई अशी माणसे आणून त्यांना दोन वेळेचे जेवण, नास्ता, दोन वेळा चहा, राहण्याची सोय करीत सुमारे पंधरा दिवसांच्या कालावधीत लावणीचे काम होते. या भाताशेतीसाठी आम्ही पैशाचा हिशोब करीत नाही. आवड आणि वाडवडीलार्जीत काम म्हणून हे करतो. यासाठी कुटुंबाची साथ मिळते. आजही आमच्याकडे गुरे-ढोरे आहेत. त्यांच्यासाठी विशेष सोय केली आहे. जरी बैल असले तरी शेती आम्ही ट्रॅक्टरनेच करतो. आमच्या घरातील मुलेही ट्रॅक्टर चालवतात.

पाटील यांनी पुढे सांगितले की, सध्या आम्ही 8 शेते लावतो. लावणीच्या अगोदर परिसरातील देवतांना आवाहन म्हणून नारळ फोडतो आणि पीक चांगले येऊ दे असे सांगतो. तो प्रसाद म्हणून सर्व मजुरांना आणि उपस्थित लोकांना देतो. प्रथम पेरलेले भात काढतो, त्याच्या मुठ्या बांधून नंतर दोन दोन रोपे चिखल केलेल्या शेतात एकत्रितपणे लावली जातात याच क्रियेला लावली म्हणतात. यावेळी काही वेळेला जुनी माणसे गाणीही म्हणतात. यामागचा उद्देश म्हणजे कामाचा थकवा दूर व्हावा असे असेल असे ही पाटील यांनी सांगितले.



Post a Comment

Previous Post Next Post