मिझोरममध्ये रेल्वेचा निर्माणाधीन पूल कोसळून १७ मजुराचा मृत्यू

 


ऐझॉल : निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळून तब्बल १७ मजुरांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना मिझोराममधील सायरांग परिसरात बुधवारी घडली आहे. तब्बल ३० ते ४० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना घडली त्यावेळी सायरंग ते आयझॉल या रेल्वे जोडणीसाठी बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या बांधकामादरम्यान ४० कामगार उपस्थित होते.

हा पूल ईशान्येकडील सर्व राज्यांच्या राजधान्यांना जोडणाऱ्या भारतीय रेल्वे प्रकल्पाचा एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून येथे बांधकाम सुरू आहे. ही घटना सकाळी अकराच्या सुमारास घडली. ईशान्य फ्रंटियर रेल्वे (NFR) चे मुख्य जनसंपर्क अधिकारी सब्यसाची डे यांनी सांगितले की, "अपघाताचे कारण आणि अपघाताच्या वेळी नेमके किती लोक उपस्थित होते, याची अद्याप पूर्ण माहिती मिळू शकलेली नाही.

मिझोरममधील ऐझॉल शहरापासून २१ किमी अंतरावर असलेल्या निर्माणाधीन पुलावर हे मजूर काम करत होते. मात्र अचानक या पुलाचा ढिगारा कोसळला. त्यामुळे पुलावर कार्यरत मजूर ढिगाऱ्याखाली दबले. या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत १७ मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अनेक मजूर अद्यापही बेपत्ता आहेत. या मजुरांना शोधण्याचे काम सुरू असल्याचे रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post