डोंबिवली ( शंकर जाधव ) : बहुजन समाज पार्टीचे नेते स्वर्गीय दयानंद किरतकर यांच्या जयंतीचे औचित्य म्हणून युग फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा कल्पना दयानंद किरतकर आणि बहुजन समाज पार्टी यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. या शिबिराचा लाभ गरजूंनी घेतला. विशेष म्हणजे यावेळी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आयुष्यमान भारत या केंद्रीय महत्वाकांक्षी योजनेची नोंदणी करून इच्छुकांना आभा कार्ड देण्यात आले.
सदर शिबिरासाठी कल्पनाताई किरतकर, युगंधर किरतकर, माधुरी किरतकर, मनोज किरतकर यांचे मार्गदर्शन मिळाले. तर शिबीर यशस्वी करण्यासाठी बीएसपी कल्याण डोंबिवली शहर उपाध्यक्ष रविकिरण बनसोडे, पदाधिकारी नितीन सोनवणे, सागर निकम, सतीश बैसाणे, मधुकर बनसोड, सुरेंद्र गौतम, राकेश राम, दत्ता सावने, आनंद मोरे, रवी बागुल, विनोद भालेराव यांनी विशेष मेहनत घेतली. शिबिराला शहरातील प्रतिष्ठित अॅड. बाविस्कर, वर्षा भास्कर, कैलास सणस यांनी भेट दिली.
पश्चिमेकडील महाराष्ट्रनगर येथील तथा युग फाउंडेशन आणि बहुजन समाज पार्टी कार्यालयात अत्रिनंदन सोसायटी, महात्मा फुले रोड, महाराष्ट्र नगर, डोंबिवली पश्चिम येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या मोफत शिबिरासाठी सत्य साई प्लॅटिनम हॉस्पिटल उल्हासनगरच्या डॉक्टरांनी मोलाचे सहकार्य केले. शिबिरात संपूर्ण आरोग्य तपासणी आणि आयुर्वेदिक नाडी परिक्षण करण्यात आले. शिबिरात रक्तदाब (बी.पी.), वजन कमी करणे / वाढवणे, केस गळणे, कोंडा होणे, मधुमेह, सांधे, हांडे दुखणे, गॅस, अपचन, पित्त, संपूर्ण बॉडी तपासणी व ब्लड तपासणी, बीएमआय, हृदयाचे स्वास्थ, त्वचा/ चामडी विकार, नेत्र चिकित्सा आणि चष्मा वाटप करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आयुष्यमान भारत साठी गरजूंना आभा कार्ड काढून देण्यात आले.