मुलतान: आशिया चषक स्पर्धेच्या १६व्या आवृत्तीला बुधवारी सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने ५० षटकांत ६ बाद ३४२ धावा केल्या. त्याच्याकडून बाबर आझमने १५१ आणि इफ्तिखार अहमदने नाबाद १०९ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ १०४ धावांवर गारद झाला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ५० षटकांत ६ गडी गमावून ३४२ धावा केल्या. कर्णधार बाबर आझमने १५१ आणि इफ्तिखार अहमदने नाबाद १०९ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. फखर जमानने १४ आणि इमाम-उल-हकने ५ धावा केल्या. यानंतर बाबर आणि मोहम्मद रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. रिझवान ५० चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने ४४ धावा करून धावबाद झाला. आघा सलमान ५ धावा करून संदीप लामिछानेचा बळी ठरला. यानंतर मुलतानमध्ये बाबर आणि इफ्तिखारचे वादळ पाहायला मिळाले.
प्रत्युत्तरात पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हारिस रौफ यांनी नेपाळच्या आघाडीच्या फळीला उद्ध्वस्त केले. संघाने १४ धावांत तीन विकेट्स गमावल्या होत्या. कुशल भुरटेल ८ धावा, आसिफ शेख ५ धावा आणि कर्णधार रोहित पौडेल खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. नेपाळच्या पडझडीनंतर आरिफ शेख आणि सोमपाल कामी यांनी चौथ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. ती भागीदारी हारिसने तोडली, त्याने आरिफ शेखला क्लीनबोल्ड केले. शेखने ३८ चेंडूत २६ धावा केल्या आल्या. यानंतर हारिसने सोमपालला रिझवानकरवी झेलबाद केले. त्याला ४६ चेंडूत २८ धावा करता आल्या. त्यानंतर शादाब खानच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली. त्याने चार विकेट्स घेत नेपाळच्या खालच्या फळीला गुंडाळले. गुलशन झा १३ धावांवर, दीपेंद्र सिंग ३ धावांवर, कुशल मल्ला ६ धावांवर बाद झाले, तर संदीप लामिछाने आणि ललित राजबंशी यांना खातेही उघडता आले नाही. पाकिस्तानकडून शादाबने चार विकेट्स घेतल्या. त्याला शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत मदत केली. नसीम शाह आणि मोहम्मद नवाज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.