चेतावणीकडे दुर्लक्ष केल्यास ई-चलन दंड
डोंबिवली : डोंबिवली शहरातील वाढती वाहतूककोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी उत्तम पर्याय शोधला आहे. आजवर शहरातील संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातात. आता चक्क याच कॅमेरात पाहून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना पब्लिक अनाऊसमेंट सिस्टममधून इशारा दिला जाणार आहे. या इशाऱ्याकडे वाहनचालकाने कानाडोळा केल्यास त्याला इ चलनातून दंड आकाराला जाणार आहे. ही सिस्टम डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशनजवळील मच्छी मार्केट आणि महात्मा फुले रोडवर सुरू करण्यात आली आहे.
डोंबिवली पश्चिमेला लावण्यात आलेल्या पब्लिक अनाऊसमेंट सिस्टम कल्याण मधील स्मार्ट सिटीतील कंट्रोल रूममध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यामध्ये एक वाहतूक महिला सिस्टमसमोर बसून डोंबिवली पश्चिमेला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात पाहून नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना आधी इशारा देते.
या सिस्टमद्वारे स्मार्ट सिटीच्या कार्यालयातून हा आवाज थेट त्या वाहनचालकाला ऐकू येतो. आवाज ऐकूनही वाहनचालकाने नियमाचे उल्लंघन केल्यास त्या वाहनाचा फोटो कॅप्चर करून त्या वाहनचालकाला ई-चलन दंड आकारला जातो अशी माहिती डोंबिवली वाहतूक पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली.
या सिस्टमनूसार ६ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत डोंबिवली पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ३७२ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी कंट्रोल रूममधून हा उपक्रम राबविला जात आहे.
डोंबिवली वाहतूक विभागाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सर्वांनी मोटार वाहन नियमांचे काटेकोर पालन करावे. स्टेशन परिसर वाहतूक कोंडीमुक्त ठेवण्यासाठी वाहतूक विभागाला सहकार्य करावे.
-उमेश गित्ते, वाहतूक पोलीस निरीक्षक (डोंबिवली)