डोंबिवली ( शंकर जाधव ) : जुलै महिन्यात कल्याण डोंबिवली परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली ,त्यामुळे बऱ्याच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत ,या पार्श्वभूमीवर आज पावसाने थोडी उघडीप दिल्याने महापालिका आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांनी कल्याण डोंबिवली परिसरातील खड्डे भरणीच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व कंत्राटदारांना गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते सुस्थितीत आणण्याच्या सूचना दिल्या. पावसाने आता उघडीप दिली असून येत्या आठवड्याभरात डांबर, कोल्ड मिक्स, पेव्हर ब्लॉक इ.च्या माध्यमातून रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम केले जाईल ,गेल्या आठवड्यातच MMRDA, MSRDC ,PWD च्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनाही त्यांच्या ताब्यातील रस्ते सुस्थितीत ठेवण्याच्या निर्देश दिले असल्याची माहिती आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी यावेळी दिली. तसेच खड्डे भरणाच्या कामांमध्ये हलगर्जी करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. खड्डे भरण्याच्या कामाच्या वेळी महापालिका महापालिकेचा लोगो आणि नाव असणारे जॅकेट न वापरल्याबाबत संबंधित कंत्राटदाराला ५०,००० रुपये दंड ठोठावल्याचे त्यांनी यावेळी सांगितले . यावेळी त्यांनी कल्याण मधील दुर्गाडी परिसर, डोंबिवली पूर्वेतील घारडा सर्कल रोड, राजेंद्र प्रसाद रोड, डोंबिवली पश्चिम येथील देवीचा पाडा ,शास्त्रीनगर रुग्णालय रोड तसेच पंचायत बावडी रोड द्वारली इ. परिसराची पाहणी केली.
यावेळी शहर अभियंता अर्जुन अहिरे ,माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, मनोज सांगळे व इतर अधिकारी वर्ग त्यांचे समवेत उपस्थित होता.