हैदराबाद : मल्याळम मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अपर्णा नायर या त्यांच्या राहत्या घरातच मृतावस्थेत आढळून आल्या आहेत. अद्याप अपर्णा नायर यांच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही. अभिनेत्री अपर्णा नायर या अवघ्या ३१ वर्षांच्या होत्या. पोलिसांना हा मृत्यू अनैसर्गिक वाटत असून तशी नोंद त्यांनी केली आहे. मृत्यूच्या काही वेळ आधीच त्यांनी आपल्या मुलीचा एक व्हिडीओही पोस्ट केला होता. अभिनेत्री अपर्णा नायर यांच्या मृत्यूसमयी त्यांची आई आणि बहीणही घरातच होत्या असे सांगण्यात येत आहे. अपर्णा यांच्या पश्चात पती संजीत आणि दोन मुली श्रेया आणि कृतिका असा परिवार आहे. अभिनेत्री अपर्णा नायर इन्स्टाग्रामवरही खूप सक्रिय होत्या.
सदरची घटना गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान घडली आहे. अभिनेत्रीच्या आई आणि बहिणीला याची माहिती मिळेपर्यंत त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. मात्र, अपर्णा यांना निपचित पडलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी अभिनेत्री अपर्णा नायर यांना मृत घोषित केले. सध्या अभिनेत्रीचा मृतदेह तपासणीसाठी रुग्णालयातच ठेवण्यात आला आहे. अपर्णा यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
अपर्णा नायरने २००५ मध्ये आलेल्या मायोखम चित्रपटामधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अभिनेत्री अपर्णा नायर यांनी 'चंदनमाझा', 'आत्मसखी', 'मैथिली वेंदुम वरुम' आणि 'देवस्पर्शम' सारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. याशिवाय त्या 'मल्लू सिंग', 'थट्टाथिन मरायाथू' आणि 'जोशीज रन बेबी रन' सारख्या चित्रपटांमध्ये देखील झळकल्या होत्या.