बाप्पाची अंधारात आरती
डोंबिवली ( शंकर जाधव ) : शहरात शंभर टक्के वीजभार भरणाऱ्या वीज ग्राहकांना आजही वीजेअभावी ताटकळत बसावे लागत आहे. वीज वितरण कंपनीच्या सोज्वळ मेंटेनन्स नावाखाली चक्क सहा-सहा तास वीज प्रवाह बंद होत आहे. मानपाडा रोडवरील नंदिवली देसले पाडा एकतानगर येथील ऐन गणेशोत्सव काळात नागरिकांना उकड्यात राहावे लागत आहे. घरात पाहुणे मंडळी आली असताना घरातील लोकांनां नाहक लाजिरवाणी परिस्थिती उद्भवली आहे. वीज वितरण अधिकारी मात्र नेहमीचीच सरकारी उत्तरे देऊन गप्प बसत आहेत.अंधारातच भक्तांना गणपती बाप्पांची आरती करण्याची वेळ आली होती.
याबाबत येथील ग्रामस्थ संजय देसले म्हणतात की वीज वितरण कंपनीतील अधिकाऱ्यांना फोन करूनही काही उपयोग होत नसल्याचे सांगितले.मानपाडा परिसरात विजेच्या दुरुस्ती कामासाठी म्हणून सकाळपासून वीज प्रवाह बंद होता. डोंबिवली शहारातील वीज ग्राहक हे शंभर टक्के विजेच्या बिलाचा भरणा करणारा ग्राहक असल्याने डोंबिवली शहराला लोडशेडिंगमधून वगळण्यात आले होते. तसेच दुरुस्ती काम करणे सोपे जावे याकरिता काही ठराविक अंतराने फिडर बसविण्यात आले. काही ओव्हरहेड तारा बदलून अंडरग्राऊंड केबल्स टाकण्यात आल्या असल्या तरी अद्याप ओव्हरहेड तारांचे माध्यमातूनच वीजपुरवठा होत असल्याचे अधिकारी सांगतात. हेवी मुख्य प्रवाह असलेली अंडरग्राऊंड केबल्सद्वारे जोडणी करण्यासाठी विजवीतरण कंपनीने तयारी दर्शवली होती पण निधी (आर्थिक) मिळत नसल्याने ते काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. ग्राहक वेळेवर वीज बिल भरूनही त्यांना बत्तीगुल समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परंतु जर एखाद्या ग्राहकाचे वीज बिल जर काही दिवस थकले तर मात्र वीज वितरण कंपनी तात्काळ वीज जोडणी बंद करते.
दुरुस्तीच्या नावावर बत्तीगुल विषयावर कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही ग्राहकांना वीज जाणार आहे याची पूर्व कल्पना देतो. काही वेळा काम पटकन होते, पण काही वेळा खूप तास लागतात. त्यामुळे आम्ही अगोदरच जास्त वेळ सांगतो. पण घरात बाप्पा असूनही सर्व व्यवहार काळोखात होतात असे महिलावर्ग सांगत आहे. स्वयंपाक करणे कठीण होत असून पाहुण्यांसमोर काळोखाच्या दृश्य कमीपणाचे वाटत आहे. बाप्पाची आरती ही समईच्या मंद प्रकाशात करावी लागत आहे. घरात इन्व्हर्टर आहेत पण ते ही चार्जिंग होत नाही अशी परिस्थिती आहे.