डोंबिवली ( शंकर जाधव ) दारुड्याने राहत्या घरातच स्वतःच्या १० वर्षाच्या गतिमंद मुलीची गळा दाबून हत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी डोंबिवलीजवळील मानपाडा गावात घडली. मुलीची हत्या केल्यानंतर दारुड्याने पत्नी काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन घडलेला प्रकार सांगून पसार झाला. मुलीची हत्या करून पसार झालेल्या दारुड्या बापाला मध्यरात्री मानपाडा पोलिसांनी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, मनोज अग्रहरी (३५) असे दारुड्याचे नाव आहे.दारुड्याची पत्नी लिलावती अग्रहरी हिच्या तक्रारीवरुन मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लिलावती यांना तीन मुली आहेत. त्यातून एक मुलगी गतिमंद आहे. दोन मुली मजुरीची कामे करतात. वडील मनोज याला दारूचे व्यसन असून तो एका किरणा दुकानात तो कामगार म्हणून काम करायचा.
दारू ढोसून आल्यावर मनोज नेहमी पत्नी आणि दोन मुलींसह बिचाऱ्या गतिमंद मुलीला मारहाण करायचा. या गतिमंद मुलीचा काही उपयोग नाही. तिला मरावेच लागेल, असे नेहमीच बोलायचा. या बद्दल पत्नीने तक्रार दाखल केली आहे. इतर दोन मुलींसह पत्नीचाही गळा दाबून ते तिला मारण्याचा प्रयत्न करायचा. गतिमंद मुलीच्या संगोपनाकडे आईचे पूर्ण लक्ष असायचे. दुपारच्या वेळेत मुलीकडे लक्ष देणे आवश्यक असल्याने ती कामावरुन काही वेळासाठी घरी यायची आणि पुन्हा कामावर जात असे.
रविवारी संध्याकाळी मनोज नेहमीप्रमाणे दारू ढोसून घरी आला. त्याने दारुच्या नशेत गतिमंद मुलीची गळा दाबून हत्या केली. मात्र शेजाऱ्यांच्याना या प्रकाराची कुणकुण लागली होती. तर मनोज हा पत्नी काम करत असलेल्या एमआयडीसीतील कामाच्या ठिकाणी गेला. तेथील कर्मचाऱ्यांना पत्नी लिलावती हिला तातडीने घरी जाण्यास सांगा. गतिमंद मुलगी मयत झाली आहे, असा निरोप दिला. तेथून दारोड्या मनोजने पळ काढला. कर्मचाऱ्यांनी मुलीची आई लिलावतीला तिच्या पतीने केलेला प्रकार सांगितला. हे ऐकून लिलावतीने तातडीने घरी गेली. तिने घरी गेल्यावर मुलगी बिछान्यावर निपचित पडली होती. दारुड्या मनोजने यानेच आपल्या गतिमंद मुलीची गळा दाबून हत्या केल्याचा संशय व्यक्त करुन केला आहे.या प्रकरणी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.