हांगझोऊ (चीन) : चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या एशियन गेम्स 2023 च्या क्रिकेट स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने सुवर्ण पदक पटकावले आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा १९ धावांनी पराभव करत सुवर्णपदक जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे.
पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद ११६ धावा केल्या. श्रीलंकेसमोर विजयासाठी ११७ धावांचे लक्ष्य होते. भारताकडून कर्णधार स्मृती मानधनाने ४५ चेंडूत ४६ आणि जेमिमाह रॉड्रिग्जने ४० चेंडूत ४२ धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून प्रबोधनी, सुगंधिका, इनोका यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
सुवर्णपदकाच्या लढतीत ११७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी अनुष्का संजीवनी कर्णधार चमारी अटापट्टूसह मैदानात उतरली. कर्णधार अटापट्टूने डावाच्या पहिल्याच षटकात १२ धावा करत संघाला वेगवान सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. यानंतर भारतासाठी डावातील तिसरे षटक टाकण्यासाठी आलेली १८ वर्षीय वेगवान गोलंदाज तितास साधूने पहिल्याच चेंडूवर अनुष्का संजीवनीची विकेट घेत श्रीलंकेच्या संघाला १३ धावांवर पहिला धक्का दिला. तितास साधूने त्याच षटकातील चौथ्या चेंडूवर विश्मी गुणरत्नेला शून्य धावसंख्येवर त्रिफळाचीत करत श्रीलंकेला दुसरा धक्का दिला. एकापाठोपाठ २ विकेट्स गमावल्यानंतर श्रीलंकेच्या संघावर दडपण वाढले होते. आपल्या दुसऱ्याच षटकात १२ धावांवर श्रीलंकेची कर्णधार चामारी अटापट्टूला पॅव्हेलियनमध्ये पाठवून तितासने श्रीलंकेच्या संघाला सर्वात मोठा धक्का दिला. पहिल्या ६ षटकात श्रीलंकेचा संघ ३ गडी गमावून केवळ २८ धावा करू शकला. श्रीलंकेकडून हसीनी परेराने २६ आणि निलाक्षी डिसिल्वाने २३ धावा केल्या. श्रीलंकेला २० षटकांत ९७ धावांवर रोखून भारतीय महिला संघाने सुवर्णपदक पटकावले. भारतातर्फे १८ वर्षीय तीतास साधूने गोलंदाजीत सर्वाधिक ३ बळी घेतले. तिने ४ षटकात केवळ ६ धावा दिल्या.