राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरादर पावसाची हजेरी
ठाणे : राज्यभर गणरायाच्या विसर्जनाचा उत्साह सुरू असताना पावसाने देखील हजेरी लावल्याने गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. ढोल ताशा, डीजेच्या धूमधडाक्यात आपल्या बाप्पाला विसर्जित करण्यासाठी सगळी मंडळ सकाळपासून मंडपाबाहेर पडलेली आहेत. काही दिवसांपासून पाऊस देखील नित्यनेमाने पडत असल्यामुळे विसर्जनाला त्याची उपस्थिती असणार याची शक्यता व्यक्त केली जात होती. ऐन विसर्जनाला पावसाने हजेरी लावल्याने भरपावसात ढोल-ताशा-लेझिमच्या तालात बाप्पाला निरोप दिला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तसेच पुढचे ४८ तास महाराष्ट्रात यलो यलर्ट जारी करण्यात आला. तर, कोकणात अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे.
मुंबई, ठाणे येथे दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक ढग दाटून आले व अनेक ठिकाणी मूसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. मुंबईतील सायन, दादर, अंधेरी व गोरेगावमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरादर पावसाने हजेरी लावली. तर ठाणे येथे देखील पावसाने दमदार हजेरी लावत विसर्जनाला ब्रेक लावला.
विले पार्ल्यात विजांचा गडगडात सुरू आहे तर जोगेश्वरी परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. गोरेगाव, मालाड परिसरातही जोरदार पाऊस झाला. कुर्ला नेहरुनगरमध्ये गेल्या अर्धा तासापासून मुसळधार सुरू असून विजांच्या गडगडाटासह पाऊस सुरू आहे.
मुंबईत अनेक भागात भर दुपारी आभाळ काळवंडून गेल्याने अंधार पसरला. या पावसातही अनेक गणेश मंडळांनी आपल्या मिरवणुका सुरूच ठेवल्या आहेत. मुंबईच्या रस्त्यांवर कार्यकर्त्यांची गर्दी आणि कोसळणारा पाऊस यामुळे गणेश विसर्जनासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या पाच दिवसांत मुंबईसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. तर, आता विसर्जनालाही गणरायावर मेघवर्षाव होत आहे.
पुणे, कोल्हापुरात सकाळपासून गणेश विसर्जन मिरवणुकीत दुपारी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. सकाळपासूनच निर्विघ्नपणे सुरू असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत दुपारनंतर पावसाने हजेरी लावली.
दरम्यान,मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, जालना,सोलापूर, उस्मानाबाद, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, परभणी, नागपूर, भंडारदरा, गोंदिया, अमरावती, आदी जिल्ह्यांमध्ये २८ सप्टेंबरसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजेच, येथे पावसाच्या मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याने तिथे अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम येथे ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.