वसई : गौरीगणपतीचे विसर्जन सुरळीत पार पाडल्यानंतर वसई-विरार शहर महापालिकेने आता गुरुवारी होणाऱ्या गणपती विसर्जनाची जय्यत तयारी सुरू केली आहे. पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी अनंत चतुदर्शीच्या विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेऊन चोख व्यवस्था ठेवण्याबाबत संबंधितांना विभागांना सूचना दिल्या आहेत. वसई-विरार शहर महापालिकेने यंदा ‘इको गणेशा २०२३’ या संकल्पनेवर पर्यावरणपूरक गणेशोत्सव राबवला आहे. त्याला वसईकर नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
वसई-विरार पालिकेने २८ सप्टेंबर गुरुवार रोजी श्री गणेशाचे विसर्जन योग्यरितीने पार पाडण्यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. पालिकेने विसर्जन व्यवस्थेसाठी दहा नियंत्रण कक्ष उभारले आहेत. त्यापैकी एक पालिका मुख्यालयात आहे.या नियंत्रण कक्षातून विसर्जन व्यवस्थेचे नियंत्रण व नियोजन केले जाणार आहे. पालिकेने विसर्जन व्यवस्थेसाठी नऊ प्रभाग समिती भागात २ हजार १६१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये पालिकेचे ८१८ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय २२७ अग्निशमन कर्मचारी, २४४ वैद्यकीय आरोग्य कर्मचारी, ४२ डॉक्टर, ७९८ सफाई कर्मचारी यांचा समावेश आहे.
नऊ प्रभाग समितीत नऊ नियंत्रण कक्ष उभाण्यात आले आहेत. तेथून विसर्जन व्यवस्थेचे नियोजन व नियंत्रण करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांना या ठिकाणी विसर्जनाच्या वेळी कुठलीही अडचण येणार नाही. नियंत्रण कक्षातील पालिकेचे अधिकारी बारकाईने एकूण व्यवस्थेवर लक्ष ठेवणार आहेत.
शहरातील एकूण २१ प्रमुख विसर्जन तलावावर प्रत्येकी एक रुग्णवाहिका असणार आहे. त्यामध्ये एक डॉक्टर, १ ए.एन.एम. आणि एक मदतनीस ठेवण्यात येणार आहे. पालिकेने शहरातील ५५ ठिकाणी १०५ कृत्रिम तलाव उभारले आहेत. या प्रत्येक ठिकाणी प्रथमोपचाराची सोय ठेवण्यात आली आहे. तसेच एक ए.एन.एम. नियुक्त केले आहे. कुठलीही वैद्यकीय गरज असल्यास आरोग्य विभागाकडून तात्काळ मदत केली जाईल.
कृत्रिम तलाव, मूर्ती संकलन केंद्र, फिरते हौद येथे विसर्जित झालेल्या मूर्ती संकलित केल्या जातील. ६० वाहनांतून शहराबाहेरील बंद दगडखाणीच्या तलावात विधीवत विसर्जन केल्या जातील. कृत्रिम तलाव, मूर्ती संकलन केंद्र, फिरते हौद याठिकाणी विसर्जन झालेल्या मूर्ती संकलित करण्यात येतात. या मूर्ती ६० वाहनांद्वारे शहराबाहेरील बंद दगडखाणींच्या तलावात नेऊन विधीवत विसर्जन केल्या जाणार आहेत. मूर्ती उचलण्यासाठी ४ क्रेन तसेच ४ फोर क्लीन यंत्राची व्यवस्था करण्यात आली आहे. उपायुक्त नानासाहेब कामठे, उपायुक्त समीर भूमकर तसेच प्रभारी सहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.