पूर्व प्राथमिकपासून माध्यमिक विद्यार्थ्यांना दिली करून ओळख
अलिबाग ( धनंजय कवठेकर) : महाराष्ट्राचा मराठमोळा नवरात्रीत खेळला जाणारा पारंपरिक खेळ म्हणजे भोंडला हा एकेकाळी मोठ्या प्रमाणात खेळला जायचा.परंतु आता हा खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे . विस्मरणात जाऊ पाहणाऱ्या या संस्कृतीचे पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न अलिबाग येथील चिंतामणराव केळकर विद्यालयाने केला आहे. त्यासाठी पूर्व प्राथमिक पासून माध्यमिक विद्यार्थ्यांना शाळेतच भोंडल्याचे आयोजन करीत मुलींना ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा या पारंपरिक गाण्यांच्या तालावर मुली उत्साहाने फेर धरत असताना पाहायला मिळत आहेत.
भोंडला हा प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो.घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो.एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. त्याभोवती फेर धरुन छोट्या मुली, व शाळेतल्या मुली भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.जिच्या घरी भोंडला असतो, तिची आई खिरापत करायची . रोज बहुधा वेगळे घर आणि त्यामुळे वेगळी खिरापत असे . म्हणजे पहिल्या दिवशी १, दुसऱ्या दिवशी २ अशा करत करत ९ व्या दिवशी ९ + १ खिरापत असे . फेर धरताना एक छोट्या मुलींचा व १ मोठ्या मुलींचा. असे २ फेरे होतात.सर्वच मुली गाणी म्हंटली जातात . नवरात्रीच्या नऊ दिवसात हस्त नक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा काढून मधोमध ठेवली जाते आणि तिच्याभोवती मुली फेर धरतात. पृथ्वीच्या सुफलीकरणाचा हा उत्सव मानला जातो म्हणून याचे महत्व विशेष आहे. बहु उंडल असा याचा अपभ्रंश आहे असेही मानले जाते. हत्ती हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो तसेच वर्षन शक्तीचे प्रतीक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते.
आपल्या परंपरेचे जतन करून मुलांच्या मनात हा ठेवा रुजवणाऱ्या चिंतामणराव केळकर विद्यालयाचे पालकवर्गातून कौतुक केले जात आहे.