तुम्ही अध्यक्षपदी असताना गद्दारी करून बाहेर पडलात

रोहिदास मुंडेंचे विरोधकांना सणसणीत उत्तर

दिवा, (आरती मुळीक परब) : मला गद्दार की खुद्दार म्हणून विचारणाऱ्यांनी स्वतः आधी आरशात पहावे. त्यांनी दिवा भाजप मंडल अध्यक्ष पदावर असताना पक्षाशी गद्दारी केली आणि मी पक्षातून बाहेर पडावे म्हणून षडयंत्र करून माझे पद काढून घेतले गेले. शिंदे गटासमोर लोटांगण घालणारे तुम्ही स्वार्थीच आहा ऊत. मी दिव्यातील जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला असे सणसणीत उत्तर रोहिदास मुंडे यांनी निलेश पाटील यांना दिले आहे.

दिव्यात शिंदे गटाच्या विरोधात आवाज उठवणारा विरोधी नेता नको म्हणून माझे पद काढून घेण्यासाठी कुणी कुणी काय काय षडयंत्र केली ही जगजाहीर आहेत. भाजपच्या मंडळ अध्यक्षचे पद जाणार हे शिंदे गटातील लोकांना दोन महिने आधीच माहिती होते. याचा अर्थ शिंदे गटाच्या इशाऱ्यावरच येथील भाजप चालवली जात होती. मी दिव्यातील जनतेचा आवाज होऊन सत्ताधारी लोकांना प्रश्न विचारत होतो, म्हणून मला राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न काहींनी केला. पण दिव्यातील जनतेसाठी मी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. दिवा शहरातील अन्यायाला यापुढे वाचा फोडण्याचे काम मी करत राहीन, असेही मुंडे यांनी म्हटले आहे.

ज्या पद्धतीने मी पक्षातून बाहेर पडावे यासाठी षडयंत्र केले गेले ते पाहता पदावर असताना पक्ष सोडणाऱ्यांशी माझी तुलना होऊ शकत नाही. माझा लढा हा प्रामाणिकपणे दिवा शहरातील लोकांच्या हितासाठी आहे. त्यामुळे दिवावाशियांचे हित जिथे आहे त्यासाठी मी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिंदे गटाच्या विरोधात लढण्यासाठी खंबीर पाठिंबा आणि भूमिका घेणारा पक्ष दिव्यात गरजेचा आहे. उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातूनच हे होऊ शकते यासाठी मी शिवसेनेचा भगवा झेंडा हातात घेतला आहे असे सणसणीत उत्तर रोहिदास मुंडे यांनी दिले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post