एका महिलेसह आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबई: मुंबईतील कांदिवली पश्चिमेकडील महावीर नगर भागातील आठ मजली इमारतीला सोमवारी दुपारी आग लागली. या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेसह ८ वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. आग लागण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
महावीर नगर भागातील पवनधाम वीणा संतूर या आठ मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की धुराचे लोट सगळीकडे पसरले होते. या आगीत ग्लोरी वालपट्टी (महिला, वय ४३ वर्षे) व जोसू जेम्स रॉबर्ट या (वय ८ वर्षे) चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर लक्ष्मी बुरा (वय ४०), राजेश्वरी भरतारे (वय २४ वर्षे) आणि रंजन सुबोध शाह (वय ७६ वर्षे) यांचा समावेश आहे. जखमींपैकी राजेश्वरी भरतारे या १०० टक्के भाजल्या आहेत. तर, लक्ष्मी बुरा व रंजन शाह हे ४५ ते ५० टक्के भाजले आहेत. या सर्वांना तातडीने शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.