पदवीधरांनी मतदार होण्यासाठी नाव नोंदणी करावी

 


जिल्हा न्यायालयात पदवीधर मतदार नोंदणी अभियान  

प्रांताधिकारी मुकेश चौहान यांचे आवाहन 

अलिबाग (धनंजय कवठेकर) : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी १ नोव्हेंबर २०२० पूर्वी पदवीधर झालेल्यांची मतदार म्हणून नोंद करता येईल. पदवीधर झाल्यानंतर तीन वर्षांनी या मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदवले जावू शकते. अन्य निवडणुकीत पूर्वीची मतदार यादी असते. मात्र, या निवडणुकीसाठी यापूर्वीची यादी गृहीत धरली जाणार नाही. त्यामुळे यापूर्वी यादीत नाव असलेल्यांनाही नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी पदवीधर असणाऱ्यांनी आपली नोंदणी करावी असे आवाहन करून पदवीधरांना विधिमंडळात आपला प्रतिनिधी निवडून पाठविण्यासाची संधी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली असल्याचे अलिबाग प्रांताधिकारी मुकेश चौहान यांनी सांगितले. 

कोकण पदवीधर मतदार नोंदणीचा कार्यक्रम रायगड जिल्ह्यात सुरु आहे. सर्व राजकीय पक्षांना निवडणूक विभागाने पदवीधर मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अलिबाग विधानसभा मतदारसंघातील पदवीधर असणाऱ्या मतदारांची नोंदणी करण्यासाठी जिल्हा न्यायालयात बार असोसिएशन आणि अलिबाग उपविभागीय कार्यालय आणि अलिबाग तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पदवीधर मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले.यावेळी प्रांताधिकारी मुकेश चौहान , तहसीलदार विक्रम पाटील , नायब तहसीलदार अजित टोळकर , ॲड. निकेत चवरकर , ॲड. राजेंद्र माळी , बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. अनंत पाटील , सचिव अमित देशमुख, ॲड. पंकज पाटील , ॲड. अजहर घट्टे , संकेत सुंकले , स्वप्नील कदम आदी उपस्थित होते. 

या मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी नावनोंदणी फॉर्मसोबत पदवी प्रमाणपत्र किंवा पदवी परीक्षेच्या मार्कमेमोची साक्षांकित केलेली प्रत आवश्यक आहे. निवडणुकीसाठी नावनोंदणीसाठी अर्ज तहसील कार्यालयात उपलब्ध राहणार आहेत. अर्ज भरल्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांकडेही तो दिला जावू शकतो. तहसीलदार त्याची छाननी करतील आणि त्यानंतर उपविभागीय अधिकारी तपासणी करून नाव यादीत घेतील. प्रत्येक तहसील कार्यालयात यासाठी एक स्वतंत्र कक्ष आहे. असे अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांनी सांगितले.   



Post a Comment

Previous Post Next Post