शेअरबाजारात २४१ अंकांची तेजी

 


मुंबई : शुक्रवारी आयटी आणि वाहन शेअर्समधील खरेदीमुळे बाजारात तेजी दिसून आली आहे. दिवसाअखेरीस सेन्सेक्स २४१ अंकांच्या वाढीसह ७१,१०६ वर बंद झाला. निफ्टीही ९४ अंकाने वधारून २१३४९ वर स्थिरावला. आजच्या व्यवहारात विप्रो ६.५९ टक्क्यांनी, एचसीएल टेक २.८३ टक्क्यांनी, टाटा मोटर्स २.२४ टक्क्यांनी, मारुती सुझुकी २.०१ टक्क्यांनी वाढून बंद झाले. एसबीआय १.१३ टक्क्यांनी, बजाज फायनान्स १ टक्क्यांनी, एचडीएफसी बँक ०.९३ टक्क्यांनी बंद झाले.

ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल, रिअल इस्टेट, मीडिया, एनर्जी, कमोडिटी, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्येही वाढ झाली आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स तेजीत राहिले. सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी २० शेअर्समध्ये वाढ आणि १० शेअर्समध्ये घसरण झाली. बँकिंग शेअर्स आणि त्याचा निर्देशांक वगळता इतर सर्व क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली आहे. निफ्टी आयटी ८०० च्या वाढीसह बंद झाला आहे. 

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) चा शेअर्स शुक्रवारी ८२१ रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. कंपनीचे शेअर्स शुक्रवारी ८.३९ टक्के वाढून ८२१ रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले. हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. नंतर शेअर्स घसरून ३.६२ टक्के वाढीसह ७९२.२० रुपयांवर बंद झाला.

शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३५६.५३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जे गेल्या सत्रात ३५४.२५ लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यापारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २.२८ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post