मुख्यमंत्र्यांचा निर्णय स्वागतार्ह – माजी आमदार सुभाष भोईर
कल्याण ( शंकर जाधव ) : महानगरपालिका हद्दीत अनधिकृत बांधकामे झाल्यास त्यावर कारवाई होईलच, शिवाय संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात केलेली घोषणा स्वागतार्ह असून त्यामुळे अनधिकृत बांधकामांना मोठ्या प्रमाणावर आळा बसेल असा विश्वास माजी आमदार सुभाष भोईर यांनी व्यक्त केला असून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत लक्ष्यवेधीवर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरासह सर्व महापालिकांमध्ये यापुढे अनधिकृत बांधकामे होणार नाहीत आणि झालीच तर या बांधकामांवर कारवाई होईलच, शिवाय या बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असे सभागृहात सांगितले. ठाणे जिल्ह्यात ठाणे व कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत आहेत.
अनधिकृत इमारतींच्या बांधकामांचा दर्जा निकृष्ट असल्याने त्या कोसळून अनेक निष्पाप नागरिकांचे यापूर्वी बळी गेले असून अशा इमारतींमध्ये घर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होतेच शिवाय महापालिकेचेही आर्थिक नुकसान होते तसेच अनेक नागरी समस्या निर्माण होतात. त्यामुळे अनधिकृत बांधकामांना आळा घालणे गरजेचे होते. त्यासाठी अनधिकृत बांधकामे झाल्यास मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल माजी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले आहेत. परंतु या निर्णयाची खरोखरच पूर्तता होईल का अथवा त्या विभागातील सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे स्थानिक कार्यकर्ते ऐकतील का ? असा देखील प्रश्न माजी आमदार सुभाष भोईर यांनी उपस्थित केला आहे.