राम मंदिराची प्रतिकृती भाविकांसाठी पुढील दोन महिने खुली डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून डोंबिवलीत एका कार्यक्रमात अयोध्येतील श्री राम मंदिराची (shree ram mandir) भव्य प्रतिकृती साकारण्यात आली. ते भव्य मंदिर कसे असेल याची अनुभूती कल्याण- डोंबिवलीसह परिसरातील लाखो रामभक्तांना अनुभवता यावी यासाठी आवर्जून ती प्रतिकृती पाहण्यासाठी डोंबिवलीकरांनी गर्दी केली होती.या राम मंदिर प्रतिकृतीचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार रवींद्र चव्हाण (ravindra chavan) यांच्या हस्ते करण्यात आले असून या राम मंदिराची प्रतिकृती भाविकांसाठी पुढील दोन महिने खुली राहणार आहे.
येत्या २२ जानेवारी ला अयोध्येत श्री राम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊन भाविकांसाठी ते खुले केले जाणार आहे. अनेक वर्षांचे देशासह विदेशातील रामभक्तांचे हे स्वप्न पूर्ण होणार असल्याने मोठ्या प्रमाणात अयोध्या परिसरात राम भक्त त्या ठिकाणी रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार असून स्थानिक पातळीवर देखील स्थानिक नागरिकांना राम मंदिराची प्रतिकृती कशी आहे हे पाहता यावे म्हणून डोंबिवली जीमखाना येथे सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून राम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या राम मंदिर प्रतिकृतीचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
कल्याण- डोंबिवलीतील रामभक्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. ६० फूट बाय ४० फूट उंच आकाराची ही राम मंदिराची प्रतिकृती असून ज्येष्ठ आणि प्रसिध्द कलादिग्दर्शक उदय अरविंद इंदप आणि त्यांची कन्या सानिका इंदप यांनी मागील काही महिने मेहनत घेऊन या प्रतिकृतीची उभारणी केली आहे. या प्रतिकृतीच्या कळसाची उंची ४० फूट असून मंदिर प्रतिकृती उभारणीत फॅब्रिकेशन, प्लायवुड, प्लास्ट्र ऑफ पॅरिस साधनांचा वापर करण्यात आले आहे तसेच मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाई त्याच बरोबर मंदिरात प्रवेश केल्यानंतर जय जय श्री राम गाण्याची धून भक्तांच्या कानी गुंजणार आहे. आज या राम मंदिर प्रतिकृतीचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले असून या राम मंदिराची प्रतिकृती भाविकांसाठी पुढील दोन महिने खुली राहणार आहे.