- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना
- ३० डिसेंबर ते २४ फेब्रुवारीपर्यंत नियोजन
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील संपूर्ण स्वच्छता मोहिमेची ( डीप क्लिन मोहीम) सुरूवात शनिवार, ३० डिसेंबरपासून ठाणे महापालिका क्षेत्रात करण्यात येत आहे. ही मोहीम २४ फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रभाग समिती क्षेत्रात राबविण्यात येणार आहे. स्वच्छतेचा दर्जा उंचावणे आणि महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागांचा कायापालट घडवून आणणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. त्यानुसार, महापालिकेने या मोहिमेची आखणी सुरू केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
ठाणे महापालिका क्षेत्रात नऊ प्रभाग समित्या आहेत. त्या सर्व क्षेत्रात डिसेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या काळात ही मोहिम राबविण्यात येईल. या काळात प्रत्येक शनिवारी एक प्रभाग समिती याप्रमाणे मोहीम राबविली जाईल. शनिवार, ३० डिसेंबर २०२३ रोजी पहिली प्रभाग समिती आणि शनिवार, २४ फेब्रुवारी २०२४ नववी प्रभाग समिती अशाप्रमाणे कार्यक्रमाची आखणी करण्यात येत आहे. शनिवारी सुरू झालेला हा उपक्रम त्या पुढील पूर्ण आठवडाभर राबविण्यात येईल. शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमाचे आयोजन मोठ्या स्वरुपात असेल. त्यादिवशी इतर प्रभाग समिती मनुष्यबळ या एकाच प्रभाग समितीमध्ये काम करेल. उर्वरित दिवशी संबंधित प्रभाग समितीतील कर्मचारी ही मोहीम पुढे नेतील, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.
संपूर्ण स्वच्छता मोहिमेत स्वच्छता (clean), स्वच्छतेतील सातत्य (maintain) आणि सुधारणा (improve) या तीन तत्वांचा समावेश आहे.
या मोहिमेत रस्ते दुभाजक, कर्बस्टोन यांची सफाई करताना आवश्यकतेनुसार त्यांची रंगरंगोटी केली जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक प्रभाग समितीतील कामांचे नियोजन करण्यात येईल. तर, उपायुक्त दर्जाचा अधिकारी या कामांसाठी नोडल ऑफिसर म्हणून काम करेल. त्यांना सहायक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांचे सक्रिय सहकार्य असेल. प्रत्येक विभागाचा सगळा कर्मचारी वर्ग हा शनिवारच्या दिवशी संपूर्ण स्वच्छता मोहिमेचे नियोजन असलेल्या प्रभाग समितीत कार्यरत राहील. याला आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि अग्निशमन दल या अत्यावश्यक सेवांचा अपवाद राहील, असेही आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.
घनकचरा विभागाचा त्या प्रभाग समितीचा १०० टक्के कर्मचारी वर्ग संबंधित प्रभाग समितीत कार्यरत राहील. तसेच, इतर सर्व प्रभाग समितींमधील प्रत्येकी किमान ५० टक्के कर्मचारी वर्ग हाही त्या प्रभाग समितीत कार्यरत राहील. स्वत:च्या प्रभाग समितीत केवळ अत्यावश्यक कामेच त्या दिवशी केली जातील. उद्यान, तलाव, अतिक्रमण, मलनि:सारण विभाग यांचे १०० टक्के कर्मचारी, तसेच, सार्वजनिक बांधकाम विभागाकडील जास्तीत जास्त कर्मचारी, साफसफाईचे सर्व ठिकाणचे मनुष्यबळ हे याच मोहिमेसाठी कार्यरत राहील.
संपूर्ण स्वच्छता मोहिमेचे वेळापत्रक
• शनिवार, ३० डिसेंबर – वागळे प्रभाग समिती
• शनिवार, ०६ जानेवारी – वर्तकनगर प्रभाग समिती
• शनिवार, १३ जानेवारी – कोपरी-नौपाडा प्रभाग समिती
• शनिवार, २० जानेवारी – माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती
• शनिवार, २७ जानेवारी – कळवा प्रभाग समिती
• शनिवार, ०३ फेब्रुवारी – उथळसर प्रभाग समिती
• शनिवार, १० फेब्रुवारी – लोकमान्य नगर– सावरकर नगर प्रभाग समिती
• शनिवार, १७ फेब्रुवारी – मुंब्रा प्रभाग समिती
• शनिवार, २४ फेब्रुवारी – दिवा प्रभाग समिती