आयुक्त अभिजीत बांगर यांचा मुलांशी संवाद
ठाणे, : शहर स्वच्छ ठेवणे हे शहरातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असताना सफाई कर्मचाऱ्यांना आपण देखील सहकार्य करणे आवश्यक आहे. रस्त्यावर कचरा टाकणे जर बंद झाले तर आणि तरच आपल्याला शहरातील रस्ते स्वच्छ दिसतील. यासाठी शिक्षकांनी स्वच्छता हा विषय विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून समजावून सांगणे गरजेचे असल्याचे सांगत आपल्या परिसरातील समस्या काय आहेत, याबाबत मुलांकडून जाणून घेणे महत्वाचे असल्याचे वक्तव्य आयुक्तांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.
तुम्हाला आपले शहर कसे असावे असे वाटते? शाळेतील स्वच्छतागृह स्वच्छ असतात का? बाहेर फिरताना तुम्हाला रस्त्यावर कचरा दिसतो का? अशा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी विविध शाळांमधील मुलांसोबत संवाद साधला.
निमित्त होते ठाणे महानगरपालिका आयोजित 'इंडियन स्वच्छता लीग २.० या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभांचे. महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इंडियन स्वच्छता लीग २.० या कार्यक्रमात विविध विषयावर सादर केलेल्या विजेत्या प्रकल्पातील विद्यार्थ्यांना आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, उपायुक्त तुषार पवार, उमेश बिरारी, अनघा कदम, वर्षा दिक्षीत तसेच विविध शाळांचे शिक्षक उपस्थित होते.
सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन करणे म्हणजे भित्रेपणा नाही, तर नियमांचे पालन जो करतो त्याची वृत्ती धाडसी असते अशा प्रकारे शिक्षकांनी विद्यार्थ्याचे प्रबोधन करावे असेही आयुक्तांनी नमूद केले. 'इंडियन स्वच्छता लीग २.० या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांचे तसेच पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व परीक्षकांचे अभिनंदन केले. तसेच इंडियन स्वच्छता लीग २.० या ठाणे महापालिकेच्या राबविलेल्या उपक्रमाची दखल केंद्र सरकारनेही घेतली असल्याचे आयुक्तांनी यावेळी नमूद केले.