१३ वर्षीय आयुषने एलिफन्टा ते गेटवे ऑफ इंडिया हे सागरी अंतर केले पार

डोंबिवली ( शंकर जाधव )  : अथक परिश्रमाच्या जोरावर १३ वर्षीय आयुष राजेश ढाके याने एलिफन्टा ते गेटवे ऑफ इंडिया हे सागरी १२ किलोमीटर अंतर न थांबता जलतरण करत ३ तास ६ मिनिटे या विक्रमी वेळेत पार केले.आयुष डोंबिवली येथील ओंकार इंटरनॅशनल स्कूल इयत्ता आठवी मधे शिकत असून त्याला लहानपणापासूनच जलतरणाची आवड आहे. त्याने आतापर्यंत विविध जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये  यश संपादन केले आहे. असे असून एकदा तरी सागराला गवसणी घालण्याचे त्याचे स्वप्न होते , त्याचाच एक भाग म्हणून त्याने एलिफन्टा ते गेटवे ऑफ इंडिया हे सागरी अंतर जलतरण करून पार करण्याचा निर्धार केला व  सराव सुरु केला.आयुष यश जिमखाना येथे रोज ४ ते ५ तास  प्रशिक्षक विलास माने  आणि रवी नवले  यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करायचा तसेच समुद्री सरावासाठी त्याला प्रशिक्षक संतोष पाटील  ह्यांचे मार्गदर्शन मिळाले.

२७ जानेवारी २०२४ रोजी पहाटे २ वाजून ३२ मिनीटांनी अंगाला ग्रीस लावून , समुद्राची पूजा करून आयुषने अरबी समुद्रात एलिफन्टा येथून सूर मारला. रात्रीचा खवळलेला समुद्र ,गार वारा , मोठी जहाजे , समुद्रातील खराब खारट पाणी ह्या सर्वांशी झुंज देत आपले पोहणे जिद्दीने चालू ठेवले. आपल्या वेगात सातत्य ठेवत आणि आत्मविश्वासाच्या बळावर अखेर त्याने गेटवे ऑफ इंडिया हे लक्ष्य गाठले. या वेळेस महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक हिरेन रानपुरा सर आणि सुनील पाटील सर हे उपस्थित होते. त्यांनी ३ तास ६ मिनिटे हा ऑफिशिअल रेकॉर्डेड टाइम असल्याचे जाहीर केले. ह्या पुढे इंग्लिश चॅनेल ( खाडी ) पोहण्याचा त्याचा मानस असून त्यासाठी त्याला प्रशिक्षक,स्टाफ तसेच सर्व हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ह्या कामगिरीची नोंद वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया येथे करण्यात आली.




Post a Comment

Previous Post Next Post