नवी दिल्ली. दक्षिण भारतीय अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या IFSO (इंटेलिजन्स फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन) ने अटक केली आहे. स्पेशल सेलने सांगितले की, दक्षिण भारतातील एका व्यक्तीने मंदानाचा डीपफेक व्हिडिओ बनवला होता.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक मुलगी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत होती. त्या मुलीचा चेहरा हुबेहुब रश्मिकासारखा दिसत होता. या व्हिडीओमध्ये ती मुलगी लिफ्टमध्ये शिरताना दिसत होती आणि तिने अतिशय रीलिव्हिंग ड्रेस घातला होता. हा व्हिडीओ मॉर्फ केलेला होता. या व्हिडीओत दिसणारी मुलगी ही रश्मिका नव्हे तर झारा ही ब्रिटिश-भारतीय वंशाची तरुणी होती. एआयचे डीपफेक तंत्रज्ञान वापरून रश्मिका मंदानाचा चेहरा झाराच्या त्या व्हिडिओवर लावण्यात आला होता.
रश्मिकाचा व्हिडिओ ६ नोव्हेंबर रोजी इंटरनेट मीडियावर प्रसारित झाला तेव्हा IFSO ने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६C आणि ६६E अंतर्गत प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याच्या फसवणुकीच्या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. यानंतर पोलिसांनी विविध इंटरनेट मीडिया कंपन्यांना पत्र लिहून माहिती देण्यास सांगितले होते. अलीकडेच पोलिसांनी बिहारमधून एका व्यक्तीला अटक केली होती.
रश्मिकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनीही या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली होती. केंद्र सरकारनेही या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर रश्मिकानेही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली होती.