हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी
नवी दिल्ली : यावर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाची जबाबदारी पुन्हा रोहित शर्माकडे सोपविण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी बुधवारी यासंदर्भात माहिती दिली. टी-२० विश्वचषकात रोहित शर्मा संघाची कमान सांभाळणार आहे तर हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. प्रशिक्षकपदी राहुल द्रविड यांना कायम ठेवण्यात आले आहे.
सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमला बीसीसीआयचे माजी सचिव निरंजन शाह यांचे नाव देण्याच्या कार्यक्रमादरम्यान, जय शाह म्हणाले की २०२३ मध्ये अहमदाबादमध्ये सलग १० विजय मिळवल्यानंतर आम्ही विश्वचषक जिंकू शकलो नाही, परंतु आम्ही मन नागरिकांचे जिंकण्यात यश आले आहे. तर २०२४ मध्ये बार्बाडोस येथे होणार्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम स्पर्धेत जेतेपद पटकावून भारतीय ध्वज फडकविण्यात आपल्याला नक्की यश येईल असे आश्वासन देखील जय शहा यांनी दिला.
यावेळी निरंजन शाह, माजी कर्णधार सुनील गावस्कर, अनिल कुंबळे आणि आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, अक्षर पटेल उपस्थित होते. विराट कोहली इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खेळत नसल्याबद्दल शाह म्हणाले की, विराट असा खेळाडू नाही, जो कोणत्याही मोठ्या कारणाशिवाय मालिकेत खेळत नाही. त्यांच्या भूमिकेवर भविष्यात चर्चा करू असे त्यांनी म्हटले.
यासोबतच प्रत्येक खेळाडूला रणजी ट्रॉफीमध्ये खेळावे लागणार असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याबाबत बीसीसीआय सचिव म्हणाले की, आम्ही याप्रकरणी केंद्र सरकारच्या सूचनांचे पालन करू. पण अजून एक वर्ष बाकी आहे, परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे आपण वाट पहावी असेही त्यांनी म्हटले.