अलिबाग : येथील समुद्र किनार्यालगत क्रीडाभुवन उभारण्यात आलेल्या संध्याछाया ज्येष्ठ नागरिक उद्यान व ओपन जिमचे उद्घाटन राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स (आरसीएफ) लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास मुडगेरीकर यांच्या शुभहस्ते रविवारी करण्यात आले. या उद्यानासाठी आरसीएफतर्फे निगमित सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत अर्थसहाय्य देण्यात आले आहे.
क्रीडाभुवन अलिबागद्वारा अलिबाग समुद्र किनार्यालगत ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान व ओपन जिमची उभारणी करण्यासाठी अर्थसहाय्य करण्याबाबत आरसीएफला विनंती करण्यात आली होती. आरसीएफ व्यवस्थापनाने वरील विनंतीचा सकारात्मक विचार करून सीएसआर अंतर्गत रुपये पंधरा लाखाचे अर्थसहाय्य मंजूर केले होते. या निधीतून क्रीडाभुवन अलिबाग संस्थेने ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान व ओपन जिमची उभारणी केली. कारखाना परिसरात एकंदरीत समाज उन्नयनासह समाजातील गरजूंना लाभदायी ठरतील अशा विविधांगी समाजोपयोगी उपक्रमांना मदतीचा हात देण्याबाबत आरसीएफ नेहमीच तत्पर असल्याचे नमूद करून माननीय पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत योजनेप्रती कटिबद्ध राहत आरसीएफचे मार्गक्रमण सुरू आहे असे आपल्या अध्यक्षीय भाषणात मुडगेरीकर यांनी या उद्घाटनप्रसंगी म्हटले.
या वेळी अलिबागेतील वयोवृद्ध ज्येष्ठ विधिज्ञ गोपाळराव लिमये यांचा सन्मान मुडगेरीकर यांच्या हस्ते करण्यात आला. आरसीएफच्या संचालक (तांत्रिकी) ऋतु गोस्वामी, मुख्य सतर्कता अधिकारी समीर रस्तोगी, कार्यकारी संचालक (थळ) अनिरुद्ध खाडिलकर, महा व्यवस्थापक (प्रोजेक्ट्स) ज्योती पाटील, महा व्यवस्थापक (वाणिज्यकी) राजीव ढोबळे, महा व्यवस्थापक (मानव संपदा व प्रशासन) संजीव हरळीकर, उप महाव्यवस्थापक (सीएसआर) मधुकर पाचरणे, जनसंपर्क अधिकारी संतोष वझे, क्रीडाभुवनचे पदाधिकारी, सदस्य यांसह अलिबागेतील ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उदय जोशी यांनी तर सूत्रसंचालन ॲड. सुशील पाटील यांनी केले.