डोंबिवली ऑलिम्पिकमध्ये ७० शाळांचा सहभाग
डोंबिवली ( शंकर जाधव ): दरवर्षी प्रमाणे डोंबिवली ऑलिम्पिकचे आयोजन रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे १० आणि ११ फेब्रुवारी २०२४ रोजी रिजन्सी अनंतम ग्राउंड, डोंबिवली पूर्व येथे करण्यात आले. ऑलिम्पिकचे उदघाटन रोटरी जिल्हा ३१४२ चे प्रांतपाल आणि प्रमुख पाहुणे मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडले. अतिथी म्हणून पूर्व प्रांतपाल डॉ. उल्हास कोल्हटकर आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सहाय्यक आयुक्ता प्रीती गाडे व सहाय्यक प्रांतपाल शैलेश गुप्ते हे उपस्थित होते.
डोंबिवली ऑलम्पिकमध्ये खो खो, लंगडी, कबड्डी, ॲथलेटिक्स, लांब उडी, गोळाफेक, कॅरम आणि बुद्धिबळ या स्पर्धात कल्याण डोंबिवलीतील ३००० शालेय मुलांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाची सुरुवात डोंबिवली रोटरी ऑलिंपिकचे ध्वजारोहण आणि राष्ट्रगीताने झाले. डॉन बॉस्को शाळेच्या दोन बँड पथकाच्या तालावर सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांचा दिमाखदार पदमार्च सादर केला. लजपत यांनी मार्चचे सूत्रसंचालन केले तर बारवे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना ऑलिम्पिकची शपथ दिली. कार्यक्रमानंतर दावडी येथील छत्रपती शिवाजी मंडळाच्या उस्ताद व विद्यार्थी यांनी लाठी काठी, दांडपट्टा, तलवारबाजी या क्रीडा प्रकारांची चित्ताथरारक प्रात्यक्षिके सादर केल्याचे रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट प्रसिद्धी प्रमुख रोटेरिअन मानस पिंगळे यांनी सांगितले.
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इस्ट सातत्याने गेली ३२ वर्षे करत असणाऱ्या या डोंबिवली ऑलम्पिक उपक्रमाचे प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी यांनी कौतुक केले . विद्यार्थ्यांनी टीव्ही पाहण्याचा कालावधी कमी करावा आणि मैदानावर जास्त उपस्थिती लावावी अशी विनंती त्यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांशी संवाद साधताना केली. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इस्टचे अध्यक्ष रघुनाथ लोटे यांनी रोटरी ऑलिम्पिकची पार्श्वभूमी आणि क्लबच्या विविध सामाजिक प्रकल्प ह्याची माहिती दिली. सूत्रसंचालन रो.विनायक आगटे यांनी केले स्पर्धा यशस्वी करण्यात डोंबिवली तील सहभागी शाळा, शिक्षक, परीक्षक विद्यार्थी, आणि डोंबिवलीकर क्रीडाप्रेमींचे मोलाचे सहकार्य लाभले.अध्यक्ष रघुनाथ लोटे, मानद सचिव डॉ. महेश पाटील, प्रकल्प प्रमुख रो सतीश अटकेकर व प्रकल्प संचालक रो. कमलाकर सावंत आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी अथक मेहनत घेतली.