युवा सेना सचिवांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण लोकसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, प्रवक्ते संजय राउत आणि आदित्य ठाकरे यांनी दौरा केल्याने हा मतदार संघ महत्वाचा असून त्याकडे लक्ष असल्याचे दिसते. यावर युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी शिवसेना ठाकरे गटाला कार्यकर्ता मिळत नाही म्हणून पक्ष नेतुत्वाला यावे लागते ही मोठी शोकांतिका असल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला.
डोंबिवली पश्चिमेला ठाकूरवाडीत 'शासन आपल्या दारी' उपक्रमात युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे आणि माजी नगसेवक जयेश म्हात्रे यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी बोलताना युवा सेना सचिव म्हात्रे म्हणाले, कल्याण लोकसभा मतदार हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे भरघोस मतांनी निवडून आले. कल्याण लोकसभा मतदार संघाचा विकास केला आणि त्यांना संसदरत्न बहुमान मिळाला आहे. आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी कल्याण पूर्वेत आले असता त्यांनी विकासावर काही बोलले नाही.शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष नेतुत्वाला तीन तीन वेळेला कल्याण लोकसभा मतदार संघात यावे लागले. हि मोठी शोकांतिका आहे. सॅडविच आणि कॉपीवर बोलून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करू नये.
म्हात्रे पुढे म्हणाले, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे डॉक्टर आहेत. त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. ते स्वच्छ प्रतिमेचे असून विरोधी पक्षात भीतीचे वातावरण पसरले आहेत. या लोकसभेत अनेक विकास कामे पूर्ण झाली आहे. नागरिकांचे प्रश्न असोत कि रेल्वेचे प्रश्न असोत, असे प्रश्न खासदार डॉ. शिंदे यांनी सोडविले आहेत.