वाराणसी : ज्ञानवापी संकुलात असलेल्या व्यासजींच्या तळघरात हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार देण्याचा आदेश वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने बुधवारी दिला. या आदेशाविरुद्ध मस्जिद इंतेजामिया समितीने अलाहाबाद उच्च न्यायालयात पुनरीक्षण याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीचे वकील एसएफए नक्वी यांनी तातडीने सुनावणीची विनंती केली आहे.
जिल्हा न्यायाधीशांनी त्यांच्या आदेशात व्यासजींच्या तळघरात असलेल्या मूर्तींचे पूजन आणि फिर्यादी शैलेंद्र व्यास आणि काशी विश्वनाथ ट्रस्ट यांनी ठरवलेल्या पुजाऱ्याकडून राग-भोग करण्याची व्यवस्था निर्देश दिले होते, त्यावर व्यासजींचे तळघर ३१ वर्षांनंतर प्रार्थनेसाठी उघडण्यात आले. बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास दक्षिणेकडील तळघर उघडण्यात आले असल्याचे मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नागेंद्र पांडे यांनी सांगितले. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, जिल्हा प्रशासनाने बुधवारी रात्री ९.३० वाजता काशी-विश्वनाथ मंदिर ट्रस्टच्या सदस्यांना पाचारण केले. त्यानंतर मशिदीच्या 'वाळुखाना'समोरील नंदीच्या पुतळ्यासमोरील बॅरिकेड्स हटवण्यात आले.
१९९३ मध्ये तत्कालीन सपा सरकारच्या काळात बॅरिकेडिंग लावून पूजा करण्याला बंदी घालण्यात आली असल्याचे देखील यादव यांनी म्हटले आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, “जिल्हा दंडाधिकारी वाराणसी/रिसीव्हर यांना सेटलमेंट प्लॉट क्र. ९१३० ठाणे-चौक, जिल्हा वाराणसी येथे असलेल्या इमारतीच्या दक्षिणेला असलेल्या तळघरात, जी वादग्रस्त मालमत्ता आहे, वादी आणि काशी विश्वनाथ ट्रस्ट मंडळामार्फत तळघरात असलेल्या मूर्तींना पुजाऱ्यामार्फत पूजा, राग-भोग करण्यात यावा. त्याचबरोबर सात दिवसाच्या आत त्याला लोखंडी कुंपण घालून संरक्षित केले जावे. जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयाला मुस्लिम पक्षाने उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर जिल्हा न्यायाधीशांनी हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार देऊन अंतिम निर्णय दिला आहे. आता या निर्णयाविरोधात आम्ही हायकोर्टात जाणार असल्याचे मुस्लिम पक्षाचे वकील मुमताज अहमद यांनी म्हटले आहे.
मंगळवारी जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात दोन्ही पक्षांनी ज्ञानवापी संकुलात असलेल्या व्यासजींच्या तळघरातील पूजेबाबतच्या अर्जावर युक्तिवाद होत असताना हिंदू पक्षाच्या वकिलांनी सांगितले की, नोव्हेंबर १९९३ पर्यंत सोमनाथ व्यासजींचे कुटुंब त्या तळघरात पूजा करत होते. मात्र ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर, १९९३ मध्ये, तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या कारकिर्दीत, तळघरातील पूजा सेवा बंद करून बॅरिकेड करण्यात आले होते.
मात्र आताची पपरिस्थिती पाहता पुन्हा हिंदूंना तिथे पूजा करण्याचा अधिकार मिळायला हवा असे यादव यांनी सांगितले. यावर आक्षेप घेत मुस्लीम पक्षाने न्यायालयाला सांगितले की व्यासजींचे तळघर मशिदीचा एक भाग आहे, त्यामुळे तेथे पूजा करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही.
विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) अध्यक्ष आलोक कुमार यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आणि म्हटले की, 'आज काशीतील न्यायालयाने प्रत्येक हिंदूचे हृदय आनंदाने भरून टाकणारा अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे.'
या निर्णयाबद्दल कुमार यांनी हिंदू समुदायाचे अभिनंदन करत म्हटले की, 'आम्हाला आशा आहे की यानंतर ज्ञानवापी प्रकरणावरही न्यायालयाचा निर्णय लवकरच येईल. पुरावे आणि वस्तुस्थितीच्या आधारे हिंदूंच्या बाजूने निर्णय होईल, असा आम्हाला विश्वास आहे. दरम्यान, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे ज्येष्ठ सदस्य मौलाना खालिद रशीद फरंगी महाली यांनी लखनऊमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या निर्णयामुळे नक्कीच निराशा झाली आहे, परंतु उच्च न्यायालयांचा मार्ग अद्याप खुला असून साहजिकच आमचे वकील त्याला आव्हान देतील.
गेल्या आठवड्यात, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने दावा केला होता की हिंदू धर्मातील सर्वात पवित्र शहरांपैकी एक १७ व्या शतकात तेथे अस्तित्वात असलेले हिंदू मंदिर नष्ट केल्यानंतर मस्जिद बांधण्यात आली होती. अहवालात म्हटले आहे की, मुघल सम्राट औरंगजेबच्या कारकिर्दीत पूर्व-अस्तित्वात असलेली रचना नष्ट करण्यात आली होती मात्र त्यातील काही भाग बदलून विद्यमान संरचनेत पुन्हा वापरण्यात आला.
सात दिवसांचा वेळ असताना एवढी घाई का - अखिलेश यादव
वाराणसी जिल्हा न्यायालयाने हिंदू पक्षाला ज्ञानवापी संकुलात असलेल्या व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर काही तासांनी हे तळघर रात्री उशिरा उघडून तेथे पूजा करण्यात आली. ज्यावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी याचा खरपूस समाचार घेतला आणि याला योग्य प्रक्रियेच्या पलीकडची कृती असल्याचे म्हटले. गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर त्यांनी म्हटले की "कोणत्याही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करताना योग्य प्रक्रिया राखली पाहिजे. वाराणसी न्यायालयाने यासाठी सात दिवसांचा कालावधी निश्चित केला होता. माात्र आता आपण जे पाहत आहोत ते योग्य प्रक्रियेच्या पलीकडे जाण्याचा आणि कोणताही कायदेशीर मार्ग रोखण्याचा एकत्रित केलेला प्रयत्न आहे.
हिंदूंसाठी भाग्याची गोष्ट- अपर्णा यादव
अपर्णा यादव यांनी ज्ञानवापीबाबत न्यायालयाच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आणि म्हणाल्या की, आता आपण आपल्या महादेवाची पूजा करू शकू ही आपल्या सर्व हिंदूंसाठी भाग्याची गोष्ट आहे. ते म्हणाले की माननीय न्यायालयाच्या निर्णयावर हिंदू समाजाचा पूर्ण विश्वास आहे. हा विजय समाजाचा मोठा विजय आहे, जिथे ३१ वर्षांपासून हिंदू समाजाचा अपमान होत आहे, तिथे पुराव्याच्या आधारे हा विजय मिळाला आहे. हा विजय म्हणजे केवळ विजय-पराजय किंवा दोन समुदाय किंवा दोन धार्मिक गटांमधील वाद नाही. पुरावे आधीच होते म्हणून हे विजय झाला असल्याचे त्यांनी म्हटले.