झाशी : झाशी रेल्वे विभागाच्या तीन हजार किमी लांबीच्या रेल्वे ट्रॅकवर लक्ष ठेवण्यासाठी एआई (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) रोबोटचा वापर केला जाणार आहे. यामुळे रेल्वे अपघातात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रेल्वे संबंधातील सिग्नल आणि OHE डेटा रोबोटच्या मेमरीमध्ये रेकॉर्ड केला जाणार आहे. इंजिन, सिग्नल आणि ओएचईमधील तांत्रिक बिघाडांबाबत हा रोबोट अधिकाऱ्यांना आगाऊ सूचना देईल. एआय तंत्रज्ञानावर स्वयंचलित सिग्नल आणि सेन्सर काम करतील. यासाठी विभागात रोबो प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे.
रेल्वे गाड्या चालवताना अत्यंत काळजी घेत असली तरी तांत्रिक बिघाडामुळे गाड्यांचे अपघात मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे रेल्वेला जीवित व वित्तहानी सहन करावी लागत आहे. त्यामुुळे झाशी विभागाने अपघात टाळण्यासाठी आणि तांत्रिक विकासासाठी AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एक रोबोट तयार केला जात आहे.
डिव्हिजनमधून जाणारी प्रत्येक ट्रेन, तीन हजार किमी लांबीचा ट्रॅक, इंजिन, सिग्नल, एचई, ३५० छोटे-मोठे पूल आणि ट्रेनची आठ हजारांहून अधिक चाके रोबोटमध्ये टाकली जात आहेत. याशिवाय विभागात बसविण्यात आलेले सेन्सर आणि स्वयंचलित सिग्नलचा डेटाही अपलोड करण्यात येत आहे. कुठेही काही त्रुटी आढळल्यास हा रोबोट तात्काळ रेल्वे अधिकाऱ्यांना अलर्ट करेल. रेल्वे अधिकारी संपूर्ण ट्रॅकचा डेटा आणि रोबोटच्या मेमरीमधील प्रत्येक लहान बिंदू फीड करत आहेत. सुरक्षित रेल्वे ऑपरेशनसाठी, रेल्वे ट्रॅक, इंजिन, सिग्नल, पूल, ओएचई, ट्रेनची चाके यासह सर्व मशीन्स आणि दळणवळणाची माध्यमे चांगल्या स्थितीत असणे आवश्यक आहे.
सध्या रेल्वे ट्रॅकची वयोमर्यादा आणि त्यातील दोष तपासण्यासाठी रेल्वे अल्ट्रासोनिक यंत्रणेची मदत घेतली जात आहे. आता संपूर्ण ट्रॅकमध्ये कुठेही काही दोष आढळल्यास विभागाला एआय रोबोटला जोडलेल्या सेन्सर्सद्वारे माहिती मिळण्यास सोपे जाणार आहे. त्याचबरोबर हे रोबोट ट्रॅक बदलण्याची वेळ आल्याची सूचना देतील.
रेल्वेबाबतच्या समस्या हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात जाणवतात. मात्र ही समस्या तेव्हाच कळू शकते जेव्हा ट्रॅक मेंटेनर ट्रॅकजवळ जाऊन हातोडा मारतो. एआय रोबोट्समुळे हे करण्याची गरज नसून रुळाबाबतची समस्यया एआय रोबोटच्या माध्यमातून आगाऊ समजण्यास मदत होणार आहे.