दिवा, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ शहरांतील नागरिकांना पाणी समस्या सुटणार

 पाणीपुरवठा योग्य दाबाने वाढविण्याचे एमआयडीसीला निर्देश 

डोंबिवली, ( शंकर जाधव ) :  दिवा, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ  या शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पाण्याची ही समस्या मार्गी लावण्यासाठी  मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. यावेळी या पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी सविस्तरणे चर्चा करण्यात आली आली. पाणीपुरवठा योग्य दाबाने वाढवावा असे निर्देश एमआयडीसीला देण्यात आले.

कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्रात प्रामुख्याने ग्रामीण भागात विशेषतः नांदिवली टेकडी परिसर, भोपर, देसलेपाडा, सोनारपाडा, दावडी,पिसवली ह्या भागांमध्ये मागील काही महिन्यात अधिक दाबाने पाणी येत होते. येथील नागरिकांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत तातडीने निर्णय घेऊन या भागांना एमआयडीसीकडून महानगरपालिकेला होणारा पाणीपुरवठा संपूर्ण दाबाने सोडण्यात यावा असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.

यावेळी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी काही महत्त्वाच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या परिसरातील जनतेला कायमस्वरूपी मुबलक प्रमाणात पाणी देण्याच्या दृष्टीने महापालिका व एमआयडीसी या दोन्ही यंत्रणांनी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री चव्हाण यांनी दिले. महापालिका प्रशासन म्हणून ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

        उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील जनतेला दहा एमएलडी जादा पाणी वाढवण्याचा तसेच कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील जनतेसाठी दिवाळीच्या काळात जो पाण्याचा दाब ठेवण्यात येतो. तोच दाब (प्रेशर) सध्या मेंटेन करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. या भागातील पाणीपुरवठा कशा पद्धतीने सुरळीत होऊ शकेल या दृष्टीने एमआयडीसी ने आपला डीपीआर येत्या दोन महिन्यांमध्ये तयार करण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले.

     कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रात एमआयडीसीच्या माध्यमातून अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यात येतो. यासाठी एमआयडीसी एक ठरावीक रक्कम आकारते. ही थकबाकीची रक्कम गेल्या काही वर्षात ६० कोटी इतकी होती. मात्र ही रक्कम पालिकेने न भरल्याने त्यावर तब्बल २३० कोटींची व्याजाची रक्कम झाली होती. ही व्याजाची रक्कम पूर्ण माफ करण्यात आली.तर ६० कोटी रुपये येत्या पाच ते सहा वर्षात प्रशासनाला टप्प्याटप्प्याने भरावे लागणार आहेत. यामुळे महापालिका प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. 

    पलावा लोधा गृह संकुलात राहणाऱ्या रहिवाशांना पाण्यासाठी व्यवसायिक दर लागू करण्याऐवजी निवासी दर लागू करण्यात येणार आहे. याबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेने कार्यवाही करावी यांसह सर्व शहरातील पाणी समस्या मार्गी लावण्यासाठी स्थानिक पालिका प्रशासन आणि एमआयडीसी प्रशासनाने संयुक्तरीत्या काम करावे. अशा सर्व सूचना आणि निर्देश यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार प्रमोद ( राजू )पाटील, यांच्यासह कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड, एमआयडीसीचे सीईओ बिपिन कुमार शर्मा तसेच सबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ  लांडगे, युवासना राज्य सचिव दीपेश म्हात्रे,उप जिल्हाप्रमुख राजेश कदम, तालुका प्रमुख महेश पाटील,माजी नगरसेवक गजानन पाटील,रवी म्हात्रे,विभाग प्रमुख अनिल म्हात्रे, विकास देसले,आकाश देसले, विलास भोईर ,युवासेना शहर अधिकारी सागर जेधे व नांदिवली टेकडी परिसर सोसायटी मधील नागरिक प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post