उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यावर भर देणार

 


  • उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांचे आश्वासन 
  •  ९७७ कोटी ३९ लाखांचा अर्थसंकल्प सादर
  • मालमत्ता, पाणीपट्टीत कोणतीही करवाढ नाही

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी २०२४-२५ साठीचा २५ लाख शिल्लक रकमेचा ९७७.३९ कोटी जमा खर्चाचा अर्थसंकल्प पालिकेचे मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे यांनी सादर केला. विशेष म्हणजे प्रशासकीय राजवट असताना देखील पालिका प्रशासनाने कोणतीही करवाढ उल्हासनगरच्या जनतेवर लादलेली नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

अर्थसंकल्प सादर करताना आयुक्त अजीज शेख यांनी काटकसरीने खर्च करीत उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यावर भर देणार असल्याचे जाहीर केले. या अर्थसंकल्पात मालमत्ता कर १५६ कोटी, पाणीपट्टी कर १० कोटी, एमआरटीपी अंतर्गत ७९ कोटी, परवाने शुल्क २९ कोटी, शासनाकडून येणाऱ्या अनुदान या पोटी ५१५ कोटी, भांडवली अनुदान अशी विविध उत्पन्न स्रोतांच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीत ९७७.३९ कोटी रुपये अपेक्षित उत्पन्न असल्याची माहिती पालिका आयुक्त अजीज शेख यांनी दिली. 

महापालिकेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांच्या वेतन आणि पेन्शनसाठी २२२ कोटी, एमआयडीसीचे पाण्याच्या बिलासाठी ५५ कोटी, विद्युत रोषणाईसाठी १५ कोटी, कचरा वाहतुकीसाठी ७२ कोटी, रस्ते आणि पायाभूत सुविधेसाठी १५५ कोटी, पाणीपुरवठा आणि मलनिस्सारणासाठी २१६ कोटी, प्राथमिक शिक्षणासाठी ४७ कोटी, उद्यान विकासासाठी ७ कोटी, परिवहन सेवेसाठी २१ कोटी, महिला व बाल कल्याण ९ कोटी, पर्यावरण ७.५ कोटी आणि इतर खर्च असे एकूण ९७७.१४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती पालिका आयुक्त अजीज शेख यांनी दिली. 

शहरातील वृक्षांची निगा व देखभालीसाठी स्वतंत्र अशा उद्यान विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. यावर्षी या विभागास गार्डन, स्वतंत्र महिला उद्यान उभारण्यासाठी ७ कोटी खर्च अपेक्षित आहे. मागील अर्थसंकल्पामध्ये शहरातील वृक्ष गणनेसाठी स्वतंत्र २५ लाख इतक्या निधी ठेवण्यात आला होता. या गणनेत शहरात ३३ हजार वृक्ष असल्याची माहिती शेख यांनी दिली. पाणी पुरवठा, जल निःसारण, मल:निसारण विभागासाठी २१६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिका इमारत ही जीर्ण झाली असून नव्याने मुख्यालयाची इमारत बनवण्यासाठी पाच कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. 

अग्निशामक विभाग हा अद्यावत करण्यासाठी १३ कोटी ४२ लाखाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. महिलांसाठी पिंक टॉयलेट या योजनेच्या माध्यमातून शौचालयासाठी २ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आलेली आहे. दिव्यांग कल्याणकारी योजना राबविण्यासाठी ११.५२ कोटी, दिव्यांग थेरपी सेंटरसाठी ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल विकसित करण्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे. सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी ३५ कोटी व तृतीयपंथीयांसाठी योजना राबविण्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद ही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. 

पथदिव्यांसाठी सोलर पॅनल बसविण्यासाठी १ कोटी तर पालिका मुख्यालयावर सोलर पॅनल बसवण्यासाठी पन्नास लाख रुपये व विद्युत विभागाच्या इतर कामांसाठी असे मिळून १३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शाळा अद्यात करण्यासाठी साडेसहा कोटी, शाळा दुरुस्तीसाठी दीड कोटी, अभ्यासिका बांधण्यासाठी दीड कोटी, शैक्षणिक साहित्य व गणवेश खरेदीसाठी तीन कोटी असे एकूण शिक्षण विभागासाठी ४७ कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आली आहे. उल्हासनगर महापालिकेच्या महासभा सभागृहात पालिका आयुक्त अजीज शेख यानी लेखाधिकारी किरण भिलारे, सचिव प्राजक्ता कुलकर्णी, उपायुक्त अशोक नाईकवाडे, प्रियंका राजपूत, लेखा परीक्षक शरद देशमुख, शहर अभियंता प्रशांत सोळंकी, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत २०२४ -२५ चा अर्थसंकल्प जाहीर केला. 

Post a Comment

Previous Post Next Post