- मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती
- महापालिकेच्या विविध उपक्रमांचे भूमिपूजन व ऑनलाईन लोकार्पण होणार
डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोळे येथे रविवारी ३ तारखेला "शासन आपल्या दारी" हा कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्य मंत्री (पंचायती राज) कपिल पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद चव्हाण व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजता संपन्न होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिका क्षेत्रात २९ जानेवारी ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत 'शासन आपल्या दारी'या उपक्रमांतर्गत संपन्न झालेल्या ४२ शिबीरात सुमारे २२०५४ लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेतला. या कार्यक्रमात 'माझी मिळकत माझी आकारणी' योजनेचे उद्घाटन, कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्क येथील ज्येष्ठ निरुपणकार तिर्थरुप डॉ.नानासाहेब धर्माधिकारी भाजी मंडईचे उद्घाटन, उंबर्डे, कल्याण (पश्चिम) येथील वाचनालय व अभ्यासिकेचे उद्घाटन ऑनलाईन स्वरुपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते संपन्न होणार आहेत. डोंबिवलीत दुपारी १ वाजता सुतिकागृह (कॅन्सर रुग्णालय) चे भुमीपुजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते संपन्न होणार आहे. फिश मार्केट डोंबिवली (पश्चिम) चे ऑनलाईन भूमिपूजन, आयरे गाव डोंबिवली (पूर्व) येथील महाराष्ट्र भुषण नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाचे ऑनलाईन भूमिपूजन तसेच शास्त्रीनगर रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्र व नवजात शिशु अतिदक्षता विभाग (एनआयसीयु) चे ऑनलाईन लोकार्पण आणि डोंबिवली (पूर्व) सुनिलनगर येथील अभ्यासिकेचे ऑनलाईन उद्घाटन व लोकार्पण हे कार्यक्रम देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.