डोंबिवली ( शंकर जाधव) : कल्याण-डोंबिवली, पलावा आणि ठाकुर्ली येथील बागप्रेमींसाठी पर्यावरण दक्षता मंडळ, डोंबिवली, इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली, इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट आणि इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने 'नंदनवन सुंदर बाग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेचे परीक्षण दिनांक ८ ते ११ जानेवारी २०२४ या कालावधीत करण्यात आले होते. श्री गणेश मंदिर संस्थान येथे या स्पर्धेचा बक्षीस समारंभ पार पडला.
घराभोवतीची बाग, निवडुंग, किचन गार्डन, टेरेस गार्डन, औषधी वनस्पती, हँगिंग वनस्पती, घराच्या आतील वनस्पती, बॉक्स ग्रील, सोसायटीची बाग, वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती बाग, नाविन्यपूर्ण गोष्टीयुक्त बाग तसेच खूप वैविध्यपूर्ण प्रजाती असलेली बाग आणि सर्वोत्तम बाग अशा विविध प्रकारच्या बागांचा समावेश होता. बक्षीस समारंभातप्रमुख पाहुणे म्हणून कल्याण -डोंबिवली महानगर पालिकेचे उद्यान अधीक्षक संजय जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते कुंडीमध्ये रोप लावून करण्यात आले. पुढील वर्षी ही नंदनवन- सुंदर स्पर्धा महानगर पालिका स्तरावर घेण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. आपल्या परिसरातील हरित क्षेत्र वाढवणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.
या स्पर्धेचे परीक्षण वनस्पतीतज्ञ डॉ. अंजली रत्नाकर आणि मीनल मांजरेकर यांनी केले. या स्पर्धेत सर्वोदय पार्क या सोसायटीला बेस्ट सोसायटी गार्डन, अष्टगणेश गार्डनला बेस्ट पब्लिक गार्डन, चिऊ पार्कला बेस्ट सस्टनेबल गार्डन आणि श्रीकृष्ण मराठे यांच्या बागेला बेस्ट गार्डन २०२४ म्हणून बक्षीस देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला वरील संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव उपस्थित होते. रूपाली शाईवाले, आदित्य कदम आणि समीक्षा चव्हाण हे ह्या स्पर्धेचे प्रकल्प समन्वयक होते.