नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने आम आदमी पक्षाचे (आप) नेते दुर्गेश पाठक यांना समन्स पाठवले आहे. त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. याशिवाय ईडीने केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांची चौकशी केल्याचे समोर आले आहे.
माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक (पीए) विभव कुमार यांची दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी केली. याच प्रकरणात तपास यंत्रणेने विभव कुमारची यापूर्वीच चौकशी केली आहे.
ते म्हणाले की, मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार कुमार यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. याप्रकरणी आम आदमी पक्षाचे आमदार दुर्गेश पाठक यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दुर्गेश पाठक यांना येत्या दोन महिन्यांत अटक केली जाईल, असा दावा दोन दिवसांपूर्वी आप नेत्या आणि दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी दावा केला होता. तसेच, त्या म्हणाल्या होत्या की, मला भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली आहे. भाजपमध्ये सामील झाले नाही, तर येत्या काही दिवसांत मला अटक केली जाईल, असाही दावा त्यांनी केला होता. यानंतर आता ईडीकडून दुर्गेश पाठक यांना समन्स पाठवण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.