एकाचा मृत्यू , २२ जण गंभीररित्या जखमी
जळगाव : येथील एमआयडीसीतील डी सेक्टरमधील मेारया ग्लोबल केमिकल कंपनीतला आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत एक कामगार जागीच ठार झाला असून २२ कामगार गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे. या आगीत सहा जण ९९ टक्के भाजली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. यामध्ये एक कामगार बेपत्ता झाला आहे. यामधील काही जखमींना खासगी तर काहींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
येथील एमआयडीसी डी सेक्टरमधील मोरया ग्लोबल केमिकल कंपनीत पहिल्या शिफ्टचे २५ कामगार कामावर हजर होते. काम सुरू असताना अचानक कंपनीला आग लागल्याचे निदर्शनास आले. आगीचे स्वरूप भीषण होते, आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने कामगारांमध्ये भीती निर्माण झाली होती. आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्यामुळे कामगारांना बाहेर पडणे कठीण झाले होते. या भीषण आगीचे वृत्त समजताच शासकीय अधिकारी पोलीस अधिकारी, रुग्णवाहिका दाखल झाल्या. जखमी व भाजलेल्यांना तातडीने सारा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
हेमंत गोविंद भंगाळे, मयूर राजू खंगार, गोपाळ आत्माराम पाटील, सचीन श्रावण चौधरी, दीपक वामन सुवा, फिरोज तडवी हे कामगार आगीत ९० टक्के भाजले गेले असून प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आगीची तीव्रता मोठी असल्याने आग विझवण्यासाठी विविध ठिकाणांहून अग्निशमन दलाचे बंब मागवण्यात आले होते. अथक प्रयत्नानंतर दुपारी आग आटोक्यात आली. घटनास्थळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे दाखल झाले होते. आगीत समाधान पाटील या कामगाराचा मृतदेह आढळून आला.