जुनी डोंबिवलीत गांवदेवी गिरीजामता पालखी सोहळा संपन्न

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) :  प्रतिवर्षाप्रमाणे जुनी डोंबिवली गावची आराध्य देवता गावदेवी गिरीजामतेचा पालखी सोहळा सोमवारी संपन्न झाला. जुनी डोंबिवली ग्रामस्थ मंडळ, जुनी डोंबिवली युवा मंडळ आणि जुनी डोंबिवली महिला मंडळाने या सोहळ्यासाठी विशेष मेहनत घेतली. पालखी सोहळा निमित्ताने गांवदेवी गिरीजामाता मंदिर आणि रस्त्याच्या दुतर्फा विद्यत रोषणाई करण्यात आली होती.

सप्तरंगी फुलांनी व रोषणाईने मंदिर सजविले होते. सकाळी मोठ्या थाटामाटात देवीची पारंपरिक पद्धतीने अभिषेक व पूजाअर्चा ग्रामस्थ देविभक्तांच्या उपस्थितीत करण्यात आली. गिरीजामतेची पूजा व दर्शन घेण्यासाठी जुनी डोंबिवली ग्रामस्थ तसेच परिसरातील भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

संध्याकाळी मंदिरातून मोठ्या उत्सवात पालखी सोहळास सुरूवात झाली. आपल्या दारी देवीची पालखी येणार म्हणून गावातील प्रत्येकांने आपल्या घरासमोर रंगबिरंगी रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. महिलांनी देवीची खणानारळाने ओटी भरून देवीचे औक्षण करून सर्वांना आनंदी ठेव असे गाऱ्हाने घातले. महिला-पुरुष पालखी सोहळ्यात आनंदाने नाचत होते. चौका-चौकात देवीवर फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली. दरम्यान पालखी सोहळ्यात देविभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची, थंड सरबत आदी व्यवस्था करण्यात आली होती. ढोल-ताशा आणि बँडच्या तालावर जेष्ठांपासून ते अगदी लहानग्यानी नाचत  गिरीजामाता पालखी सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post