नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने गुरुवारी आणखी एक यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे (narayan rane) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर केंद्रीय मंत्री राणेंचा सामना विनायक राऊत यांच्याशी होणार आहे. विनायक राऊत (vinayak raut) हेे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) त्यांना पुन्हा रिंगणात उतरवले आहे. आतापर्यंत भाजपने या जागेवरून एकही निवडणूक लढवली नाही. राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ही जागा जिंकली होती.
नारायण राणे यांनी २००५ मध्ये शिवसेनेविरोधात बंड केले होते. मात्र, राणेंचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू झाला. १९६८ मध्ये वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी नारायण राणे यांनी युवकांना शिवसेनेशी जोडण्यास सुरुवात केली. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नारायण राणे यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच गेली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेही नारायण राणे यांची तरुणांमध्ये प्रसिद्धी पाहून प्रभावित झाले होते. त्यांच्या संघटन क्षमतेमुळे ते लवकरच चेंबूरमधील शिवसेनेचे शाखाप्रमुख झाले.
२०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसलाही अलविदा करून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आणि भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेत पोहोचले. शेवटी त्यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन केला.