डॉ श्रीकांत शिंदे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कौतुक
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विकासदशक कार्य अहवालाचे प्रकाशन
डोंबिवली ( शंकर जाधव ) : आज मी आपल्यासमोर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुख्य नेता, या राज्याचा मुख्यमंत्री आणि तुमच्या खासदाराचा पिता म्हणून या ट्रिपल रोलमध्ये उभा आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाबद्दल समाधानी असून त्याची विकासाची गाडी राईट ट्रॅकवरच नाही तर फुल स्पीडमध्ये आहे. तर डॉ.श्रीकांत शिंदे आता केवळ खासदार नाही तर संसदरत्न असून त्याचाही आपल्याला अभिमान असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकासकामांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सार्वजानिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, मनसे आमदार राजू पाटील आदी महायुतीच्या प्रमूख नेत्यांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिरात करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री यांनी दिलखुलासपणे खासदार डॉ. शिंदे यांनी दहा वर्षात केलेल्या विकासकामांचे कौतुक केले.
डॉ. श्रीकांत शिंदे याच्या रूपाने आपण आदर्श लोकप्रतिनिधी आणि आदर्श खासदार दिल्लीला पाठवला असल्याचे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी डोंबिवलीत काढले. कल्याण लोकसभेच्या मतदारसंघांनी त्याला खासदार म्हणून त्याला स्वीकारलेले असून बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि मोदीजींनी ठेवलेला विश्वास आणि मतदारांचा आशीर्वाद तसेच महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांची घेतलेल्या मेहनतीमुळे डोंगराएवढी ही कामे करणे शक्य झाल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर चौफेर विकास कसा करायचा याची नस त्याला कळलेली असून आपण त्याला २०१४ मध्ये निवडून दिलेत, २०१९ मध्ये निवडून दिले आणि २०२४ मध्येही पुन्हा निवडून देणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
लोकांनी ठरवावे भविष्यात कसा विकास हवा आहे - खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना गेल्या १० वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. या १० वर्षात लोकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला आणि गेल्या १० वर्षांचे प्रगतीपुस्तक आज जनतेसमोर ठेवण्याचे काम करतोय, असे यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. तसेच आता लोकांनी ठरवायचे आहे, की भविष्यात आणखी कशा पद्धतीने विकास हवा आहे, असे आवाहन केले.यावेळी उपस्थित नागरिकांसमोर गेल्या दहा वर्षात लोकसभेत केलेल्या कामांचे मुख्यमंत्री आणि जनतेसमोर सादरीकरण करत कामांची सखोल माहितीही डॉ.शिंदे यांनी दिली. देशात रेल्वेचे सर्वाधिक काम २०१४ ते २०२४ या १० वर्षात झाले असून कल्याण लोकसभेतही मोठ्या प्रमाणात कामे झाल्याचे यावेळी सांगितले. रेल्वेची पाचवी सहावी मार्गिका, कल्याण यार्ड रिमॉडेलिंग, सरकते जिने, होम प्लॅटफॉर्म अशा अनेक सुविधा देण्यासह रस्ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी पक्क्या रस्त्यांचे जाळे तयार केल्याचे यावेळी सांगितले. रिंग रोड, विठ्ठलवाडी कल्याण उन्नत महामार्ग मोठागाव माणकोली पूल, ऐरोली काटई फ्री वे, तळोजा मेट्रो असे अनेक गेमचेंजर प्रकल्प कल्याण लोकसभेत मागील १० वर्षात झाले, अशी माहिती यावेळी दिली. आरोग्य सुविधेतही कल्याण लोकसभेत सर्वोत्तम सुविधा दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. उल्हासनगरमधील मोफत सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज, शासकीय रुग्णालयांमध्ये आधुनिक सुविधा पुरवणे अशी कामे केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
निश्चितच कौतुक केले पाहिजे असे सांगत मनसे संपूर्ण ताकदीने काम करून विजयापर्यंत पोहचण्यासाठी आमचा खारीचा वाटा उचलू अशी ग्वाही मनसे आमदार राजू पाटील यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, मनसेचे आमदार राजू पाटील, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,माजी आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे, रिपाई आठवले गटाचे प्रल्हाद जाधव, रिपाई जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव, पीआरपी कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजप कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे, स्टार प्रचारक राहुल लोंढे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, राष्ट्रवादी प्रदेश सचिव भरत गंगोत्री, महिला आघाडी जिल्हाप्रमुख लता पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.