भारतीय हवामान विभागाचा इशारा
मुंबई: मुंबईसह राज्यभरात उन्हाचा पारा वाढत असतानाच भारतीय हवामान खात्याने राज्यात ८ ते १० एप्रिलदरम्यान तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भात काही ठिकाणी गारपीट होईल तर काही ठिकाणी तापमानात वाढ होणार असून पारा ४० अंशांवरच राहण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे येत आहेत. तसेच रविवारपासून अरबी समुद्रावरूनही बाष्पयुक्त वारे येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमधील तापमानात वाढ होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे त्याचबरोबर मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमध्ये हवेतील आर्द्रता वाढून उकाडा वाढणार आहे. पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरांसाठी हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील.
गुढीपाडव्याच्या दिवशी मंगळवारी किनारपट्टीवगळता राज्याच्या बहुतेक भागांत वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उकाडा काहीसा कमी होणार असला तरी शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे.
याशिवाय, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, नांदेड, लातूर, परभणी, वाशिम, हिंगोली या जिल्ह्यांमध्येही हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्येह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे.