अनिरुद्धाज्‌‍ अकॅडमीतर्फे एकाच दिवशी १२० ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन



  •  १४ हजाराहून अधिक युनिटस्‌‍ रक्त संकल
  • १९९९ सालापासून दोन लाख रक्तपिशव्या संकलित

मुंबई, (सुहास जाधव) : १९९९ सालापासून ‘अनिरुद्धाज्‌‍ अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ आणि सलग्न संस्थांकडून आयोजित महारक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उष्णतेची मोठी लाट असतानाही यावर्षी आयोजित महारक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला. रविवारी २१ एप्रिल महारक्तदान शिबिराअंतर्गत मुंबईसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी, तसेच दिल्ली, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, गुजरात या राज्यांमध्ये एकाच दिवशी १२० ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमधून १४ हजार ३२७ रक्तपिशव्या इतके रक्त संकलित झाले. गेल्या चोवीस वर्षात संस्थेनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरातून रक्त संकलनाचा दोन लाख युनिटस्‌‍चा टप्पाही या दिवशी ओलांडला गेला. 

देशात दरवर्षी लाखो युनिट रक्ताचा तुटवडा भासतो. वेळेत रक्त न मिळाल्याने कित्येकांना प्राण गमवावे लागतात. ‘अनिरुद्धाज्‌‍ अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ ‘श्री अनिरुद्ध आदेश पथक’, ‘दिलासा मेडिकल अँड रिहॅबिलिटेशन सेंटर’, ‘अनिरुद्ध समर्पण पथक’, ‘श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन’, ‘अनिरुद्धाज्‌‍ हाऊस ऑफ फ्रेंडस्‌‍’ या सर्व संलग्न संस्था दरवर्षी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडतात. 

रविवारी २१ एप्रिलला संस्थांतर्फे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  एकाच दिवशी महारक्तदान शिबिराअंतर्गत विविध ठिकाणी रक्तदान शिबीर पार पडले. महाराष्ट्रात सुमारे १०० ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन झाले. मुंबईत बांद्रा येथील न्यू इंग्लीश स्कूल येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. तर पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, धुळे, जळगांव या शहरांसह अनेक ठिकाणीही रक्तदान शिबीर झाले. या सर्व रक्तदान शिबिरातून एकूण १४ हजार ३२७ रक्तपिशव्या संकलित झाल्या.

मुंबईत आयोजित रक्तदान शिबिरातून ७ हजार २९ युनिटस्‌‍, पुण्यातून १ हजार २० युनिटस्‌‍ आणि उर्वरित महाराष्ट्र व इतर राज्यात ६ हजार २७८ युनिटस्‌‍ रक्त संकलित झाले आहे. 

‘अनिरुद्धाज्‌‍ अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ व संलग्न संस्थांतर्फे वर्षातून एकदा महारक्तदान शिबीर, तसेच वर्षभर विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत असते. हे वर्ष या आयोजनांसाठी आणखी महत्त्वाचे ठरले. कारण यावर्षी गेल्या २४ वर्षात संस्थेतर्फे आयोजित शिबिरांमधून रक्त पिशव्यांच्या संकलनाचा मोठा टप्पा ओलांडला गेला. १९९९ सालापासून अशा शिबिरांमधून संस्थेतर्फे दोन लाख रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या आहेत. २०२३ सालात या संस्थांनी महारक्तदान शिबिरासह संपूर्ण वर्षभरात १७९ रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. यामध्ये २५ हजार ५३५ युनिटस्‌‍ रक्त संकलित झाले होते. 

दरम्यान, २१ एप्रिलला आयोजित महारक्तदान शिबिरात एकूण १६६ रक्तपेढ्या सहभागी झाल्या होत्या. मुंबईतील रक्तदान शिबिरात ३९ रक्तपेढ्यांनी सहभाग घेतला होता.



Post a Comment

Previous Post Next Post