- भारती कामडी यांच्यानिमित्ताने पालघर जिल्ह्यातील महिलांचा सन्मान!
- शिवसेना नेता तथा आमदार सुनील शिंदे यांना विश्वास
विरार, ( सुहास जाधव) : पालघर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारार्थ नालासोपारा-वाघोली डेअरी मैदान येथे रविवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना आ.सुनील शिंदे यांनी भाजपवर टीका करत देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहेत. भाजपचे अनेक नेते बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याचे आरोपी आहेत. मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली जाते. अशावेळी शिवाजी महाराजांचा आदर्श मानणाऱ्या उद्धवजींनी पालघर लोकसभेत महिला उमेदवार देऊन पालघर जिल्ह्यातील तमाम महिलांचा सन्मान केला आहे. या लोकसभा निवडणुकीत पालघर व देशातील महिला ‘हुकूमशाही मोदी सरकार`ला त्यांची जागा नक्की दाखवतील, असा विश्वास शिवसेना नेते तथा आमदार सुनील शिंदे यांनी व्यक्त केला.
पालघर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारार्थ नालासोपारा-वाघोली डेअरी मैदान येथे रविवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाविकास आघाडी -भारत जोडो अभियान आयोजित या सभेला आमदार सुनील शिंदे यांनी मार्गदर्शन केले. या सभेला वसईकर नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या वेळी प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनीदेखील आर्थिक, सामाजिक पातळीवर मोदी सरकारने देशाला कसे उद्ध्वस्त केले आहे, हे विविध दाखले देत पटवून दिले.
दरम्यान; लोकसभा उमेदवार भारती कामडी यांनी ६९ गावा`चा पाणी प्रश्न, बुडती वसई, २९ गावे महापालिकेतून वगळणे, हॉस्पिटल आदी प्रश्न जोरकसपणे मांडले. वसई-विरार भागाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी या प्रसंगी उपस्थित नागरिकांना दिली.
या सभेला शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज देशमुख, काँग्रेस जिल्हाप्रमुख ओनिल आल्मेडा, काँग्रेस प्रदेश सचिव विजय पाटील, दत्ता धुळे, मनोज म्हात्रे, मुकेश शर्मा, कुमार राऊत, मॅकेन्झी डाबरे, नावेल डाबरे व डॉमनिका डाबरे आदींनी संबोधित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हिन्सेंट परेरा; तर आभार राजन पाटील यांनी मानले.