दोन्ही देशांतील दूतावासांना अहवाल पाठवण्याचे निर्देश
नवी दिल्ली : मसाल्यांचा जगातील सर्वात मोठा उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार असलेल्या भारताने सिंगापूर आणि हाँगकाँगच्या अन्न सुरक्षा नियामकांकडून दोन भारतीय कंपन्यांच्या मसाल्यांच्या उत्पादनांच्या दर्जाबाबत तपशील मागवला आहे. सरकारने दोन्ही देशांतील दूतावासांना या प्रकरणी अहवाल पाठवण्यास सांगितले आहे.
सिंगापूर आणि हाँगकाँगने अलीकडेच एमडीएच आणि एव्हरेस्ट कंपन्यांच्या काही मसाल्यांच्या उत्पादनाबाबत चिंता व्यक्त करत बंदी घातली आहे. वाणिज्य मंत्रालयाने या दोन्ही देशांतील भारतीय दूतावासांनाही या प्रकरणाचा सविस्तर अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
मंत्रालयाने एमडीएच आणि एव्हरेस्ट या बंदीखाली समाविष्ट असलेल्या दोन कंपन्यांकडून तपशीलही मागवला आहे. त्यांच्या उत्पादनांवर अनुज्ञेय मर्यादेपेक्षा जास्त कीटकनाशक 'इथिलीन ऑक्साईड' असल्याच्या आरोपामुळे बंदी घालण्यात आली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, "कंपन्यांकडून तपशील मागविण्यात आला आहे. भारतीय मसाल्याच्या उत्पादनांना नकार देण्याचे मूळ कारण शोधले जाईल आणि संबंधित निर्यातदारांशी समन्वय साधून त्याचे निराकरण केले जाईल," असे वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
या संदर्भात सिंगापूर आणि हाँगकाँग येथील दूतावासांकडून तांत्रिक तपशील, विश्लेषणात्मक अहवाल आणि निर्यातदारांविषयी तपशील मागवण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय सिंगापूरच्या फूड सेफ्टी बॉडी आणि हाँगकाँगच्या अन्न आणि पर्यावरण स्वच्छता विभागाकडूनही तपशील मागवण्यात आला आहे. निर्यात केलेल्या मसाल्यांच्या उत्पादनांमध्ये इथिलीन ऑक्साईडची अनिवार्य चाचणी करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी उद्योग सल्लामसलत देखील निश्चित केली आहे.
दरम्यान, स्पाइसेस बोर्ड ऑफ इंडिया एमडीएच आणि एव्हरेस्टच्या चार मसाले-मिश्रित उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. हाँगकाँगच्या अन्न सुरक्षा नियामकाने ग्राहकांना ही उत्पादने खरेदी करू नयेत आणि व्यापाऱ्यांनी त्यांची विक्री करू नये असे सांगितले आहे तर सिंगापूर फूड एजन्सीने उत्पादने परत मागवण्याचे आदेश दिले आहेत.