Salman Khan home Firing: अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार

 

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खान (salman khan)  यांच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये अज्ञात दुचाकीस्वार दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी हजर आहे. पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक बाजूने तपास करत आहेत. या प्रकरणात बिष्णोई टोळीचे नाव समोर येत आहे.

अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबईचे डीसीपी राज तिलक रोशन यांनी सांगितले, की रविवारी पहाटे पाचच्या सुमारास अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर दोन अज्ञातांनी गोळीबार केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. या प्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून आरोपींना पकडण्यासाठी अनेक पथके तयार केली आहेत. मुंबई पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा पुन्हा गोळीबार झाला तेव्हा सलमान खान घरी उपस्थित होता.

 या गोळीबारात चार ते पाच राऊंड झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य समोर आले आहे. ते म्हणाले, "सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची पोलीस चौकशी करत आहेत, सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही, त्यावर अंदाज लावणे योग्य नाही."

Post a Comment

Previous Post Next Post