शिक्षकांसह सर्व स्तरातील संघटनांचा आ. निरंजन डावखरे यांना पाठिंबा




ठाणे,: कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आमदार निरंजन वसंत डावखरे यांना कोकणातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबरोबरच विविध स्तरांतील संघटना व समाजघटकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. कोकणातील सुविधांबरोबरच पदवीधर-स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी आमदार डावखरे यांनी १२ वर्षांत सातत्याने आवाज उठविल्याबद्दल संघटनांकडून आभार मानण्यात आले. तसेच या निवडणुकीत पाठिंबा जाहीर करून बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.


विधान परिषदेच्या निवडणुकीत कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांना महायुतीतील सर्व घटक पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपाईं (आठवले) पक्षांबरोबरच मनसेनेही आपला उमेदवार मागे घेऊन निरंजन डावखरे यांना साथ दिली. ठाण्यात नुकत्याच झालेल्या भव्य मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पहिल्याच फेरीत विजय मिळविण्याचा निश्चय करण्यात आला. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. महायुतीच्या कार्यकर्त्यांबरोबरच विविध संघटनाही डावखरेंच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत.




कोकण शिक्षक मतदारसंघातील माजी आमदार दिवंगत रामनाथ मोते यांची महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना, भाजपाचे आमदार किसन कथोरे संस्थापक असलेली महाराष्ट्र राज्य स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघ यांच्यापाठोपाठ भाजपाचे विद्यमान शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेनेही आमदार डावखरे यांना पाठिंबा जाहीर केला.


 शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांच्या मार्गदर्शनाखालील महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेचे (मस्ट) डॉ. विजय पवार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे (२६ संस्थांचे फेडरेशन) राज्याध्यक्ष केशवराव जाधव, महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज् असोसिएशनचे (मेस्टा) ठाणे जिल्हाध्यक्ष नरेश पवार, अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाचे अध्यक्ष डॉ. आर. बी. सिंह, खान्देश सेनेचे अध्यक्ष सुहास बोंडे, ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघ, ठाणे जिल्हा कला अध्यापक संघ, पदवीधर माजी विद्यार्थी शिक्षक पालक संस्था आदी संघटनांनी पाठिंब्याची पत्रे आमदार डावखरे यांना सोपविली.




Post a Comment

Previous Post Next Post