कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपतर्फे निरंजन डावखरे



ठाणे (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपतर्फे विद्यमान आमदार निरंजन डावखरे (niranjan davkhare) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयातून राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्याकडून प्रसिद्धीपत्रकान्वये निरंजन डावखरेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघात उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आमदार निरंजन डावखरे यांनी आभार मानले आहेत. तसेच भाजपचे कोकणातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवेन, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून २०१२ पासून कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले जात आहे. ते यंदा सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगार पदवीधरांना नोकरीबरोबरच कोकणातील सामान्य नागरिकांसाठी आरोग्य, रस्ते आदींसह पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आमदार डावखरे यांनी प्रयत्न केले आहेत. तसेच कोकणात शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळांमध्ये डिजिटल साहित्य व प्रयोगशाळांची निर्मिती केली आहे. जनतेशी थेट संपर्क, प्रत्येक प्रश्नाची खोलात जाऊन घेतलेली माहिती, कार्यकर्ते व अधिकाऱ्यांशी संवाद ही त्यांच्या कामाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post