नवी दिल्ली : अमूलनंतर आता मदर डेअरीनेही सोमवारी दिल्ली-एनसीआरमध्ये दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली आहे. गेल्या १५ महिन्यांपासून उत्पादन खर्चात वाढ झाल्याने दुधाची दरवाढ करण्यात आल्याचे मदर डेअरीने स्पष्ट केले आहे. दुधाच्या सर्व प्रकारांच्या किमतीत सोमवारपासून वाढ दिल्ली-NCR आणि इतर बाजारपेठांमध्ये लागू होईल. याआधी रविवारी अमूलने दर वाढवण्याची घोषणा केली होती.
उत्पादकांच्या उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्यामुळे त्याची भरपाई भरून काढण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये, मदर डेअरीचे फुल क्रीम दूध आता ६८ रुपये प्रति लिटर, तर टोन्ड आणि दुहेरी-टोन्ड दूध अनुक्रमे ५६ रुपये आणि ५० रुपये प्रति लिटर दराने मिळणार आहे. म्हशी आणि गाईच्या दुधाचे दर अनुक्रमे ७२ रुपये आणि ५८ रुपये प्रतिलिटर झाले आहेत. टोकन दूध (बल्क वेंडेड दूध) ५४ रुपये प्रति लिटर दराने विकले जाईल.
मदर डेअरी सध्या दिल्ली-एनसीआरमध्ये दररोज ३५ लाख लिटर दुधाची विक्री करत असते. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांच्या द्रव दुधाच्या किमतीत शेवटचा बदल केला. मदर डेअरीने सांगितले की, गेल्या काही महिन्यांत दूध खरेदीसाठी जास्त दर देऊनही ग्राहकांच्या किंमती कायम ठेवण्यात आल्या होत्या.
रविवारी रात्री उशिरा गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF), जे अमूल ब्रँड अंतर्गत दुग्धजन्य पदार्थांचे मार्केटिंग करते, त्यांनी सोमवारपासून देशभरात दुधाच्या दरात सुमारे २ रुपयांनी वाढ केली. २ रुपये प्रति लिटर वाढ एमआरपीमध्ये ३-४ टक्के वाढ होते. जी अन्नधान्याच्या सरासरी महागाईपेक्षा खूपच कमी आहे, असे GCMMF ने रात्री उशिरा दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. GCMMF ने म्हटले आहे की फेब्रुवारी २०२३ पासून, त्याने प्रमुख बाजारपेठेतील ताज्या पाउच दुधाच्या किमती वाढवल्या नाहीत.