अयोध्या: अयोध्या येथे श्री रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीनंतर आता जिल्ह्याची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अयोध्या वेळोवेळी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असताना येथील सुरक्षा व्यवस्था एनएसजी कमांडोच्या सोपविण्यात येणार आहे. त्यासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. भविष्यात येथे एनएसजी कमांडोची एक तुकडी स्थापन करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र याबाबत केंद्र सरकारची मंजुरी अद्याप बाकी आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत केंद्र सरकारच्या दोन आणि राज्य सरकारच्या चार सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. येथे मोठ्या प्रमाणात राजकीय नेते तसेच उद्योगपती यांचे येणेजाणे सुरू असते त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी दिल्लीतून एनएसजी कमांडो बोलावले जातात. राममंदिराच्या उभारणीनंतर जिल्ह्यात व्हीव्हीआयपींच्या भेटी वारंवार होत असून येथे भाविकांची मोठी गर्दी असते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनएसजी टीमने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून एनएसजी युनिट सुरू करण्यासाठी योग्य अशी जागा उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. त्यामुळे अशा भूखंडाची शोधाशोध प्रशासनाकडून सुरू आहे. याबाबत पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार यांनी सांगितले की, अयोध्येत एनएसजी युनिट सुरू झाल्याची माहिती आहे, मात्र त्याबाबतची संपूर्ण माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.