जीवितहानी टळली.. नागरिक प्रचंड घाबरले
डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीजवळील इंडो अमाइन्स आणि मालदे केमिकल कंपनीला बुधवारी १२ तारखेला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.आग लागताच कंपनीतील कामगार बाहेर आल्याने जीवितहानी टाळली.मात्र या दोन्ही कंपनी आगीत जळून खाक झाल्या. आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आजुबाजूकडील इमारतीमधील रहिवाशी घाबरले आहेत.जवळील अभिनव शाळेतील विधार्थ्याना घरी पाठविण्यास आले. तर या आगीत रस्त्याच्या कडले उभी केलेल्या तीन शालेय मिनीबस जळाल्या.
डोंबिवली पूर्वेकडील इंडो अमाइन्स ही एन्ग्रोइंटरमिडी ( खत बनविण्यासाठी रॉ मटेरियल ) बनविणारी कंपनी आणि कॅपेसीटर बनविणारी मालदे केमिकल कंपनी या दोन्ही आगीला सकाळच्या सुमारास आग लागल्याचे समजताच घटनास्थळी अग्निशामक दलाचे १५ बंब आले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. चार ते पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर निंयत्रण मिळविण्यात आले. आग लागल्याचे समजताच कंपनीतील कामगारबाहेर धावत गेल्याने जीवितहानी टळली. आग लागल्याची समजताच घटनास्थळी पोलीस उपायुक्तांसह राजकीय पक्षातील नेते मंडळीही आले होते.
आग लागल्याने आजूबाजूला केमिकलचा वास पसरल्याने नागरिक पुरते वैतागले होते.आजूबाजूकडील नागरिकांनी आपण राहणार कसे असा प्रश्न पत्रकारांशी बोलताना केला.तर भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब म्हणाले, कंपनीत प्रशिक्षित कामगार नसल्याने आग लागल्यानंतर परिस्थिती कशी हाताळावी हेच त्यांना समजत नाही, २३ मे रोजी अमुदान केमिकल कंपनीला आग लागल्याचे समजताच घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उद्य सामंत यांनी पाहणी केली होती.केमिकल कंपनी स्थलांतर बाबत सरकार निर्णय घेईल.
बसपा प्रदेश महासचिव डॉ. प्रशांत इंगळे म्हणाले, शासनाची दुप्पटी भूमिका यात दिसत आहे. स्फोटजीवित हानी होते याकडे का कानाडोळा केला जात आहे. लोकप्रतिनिधी किंवा कुठलाही राजकीय पक्षाने याकडे माणसाकडे पहिले पाहिजे नंतर राजकारण करावे.
कंपन्या हवलण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा- जितेंद्र आव्हाड
डोंबिवलीच्या 'एमआयडीसी'तील केमिकल कंपनीला आज पुन्हा एकदा भीषण आग लागली आहे. दुर्दैवी बाब म्हणजे स्फोट झालेल्या ठिकाणापासून जवळच शाळा देखील आहे. महिनाभरापूर्वी जेव्हा डोंबिवलीत अशा प्रकारची घटना घडली होती, तेव्हा खुद्द मुख्यमंत्र्यांनी अशा अतिधोकादायक कंपन्या अंबरनाथ 'एमआयडीसी'मध्ये हलवणार असल्याचे सांगितले होते. ही प्रक्रिया कुठवर आली आहे? घटना घडल्या की फक्त मोठ्या घोषणा करायच्या आणि नंतर निवांत बसायचं, हे कुठवर चालणार? माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी तातडीने या कंपन्या हवलण्यासाठी आढावा बैठक घ्यावी आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा. या दुर्घटनेत कुठलीही जीवीतहानी झाली नसावी ही आशा. डोंबिवलीकरांनो काळजी घ्या.