ठाणे, : ठाणे शहरातील पदवीधर तरुण-तरुणींबरोबरच विविध शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून आमदार निरंजन डावखरे यांना प्रतिसाद मिळत आहे. गेल्या १२ वर्षांत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच विविध कार्याला नागरिकांकडून पसंती मिळत आहे.
आमदार निरंजन डावखरे यांच्यासह भाजपाचे माजी नगरसेवक सुनेश जोशी, माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे अध्यक्ष सचिन मोरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये नुकताच संपर्क साधण्यात आला. तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केलेल्या कार्याची व भविष्यातील संकल्पाची माहिती देण्यात आली.
नौपाडा येथील सरस्वती स्कूल, शिवसमर्थ विद्यामंदिर, चरई येथील मावळी मंडळ, श्रीरंग विद्यालय, माजिवडा येथील ग्रामीण शिक्षण संस्था हायस्कूल, वर्तकनगर येथील थिराणी हायस्कूल, घोडबंदर रोड येथील लोढा वर्ल्ड हायस्कूल या शाळांमध्ये सभा झाल्या. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
जग अत्यंत वेगाने बदलत असताना सरकारी शाळांमध्ये डिजिटल शिक्षण आवश्यक आहे. त्यादृष्टीकोनातून कोकणातील प्रत्येक शाळेत संगणक देण्यात आला. त्यातून प्रत्येक मुलाला अद्ययावत ज्ञान उपलब्ध होईल, याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यानुसार कोकणातील शेकडो शाळांना संगणक वाटप करण्यात आले आहे. विद्यार्थी घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची असते. अशा गुणवंत शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी वसंत स्मृती पुरस्कार देण्यात आले, असे नमूद करून आमदार निरंजन डावखरे यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ठिकठिकाणी मोफत ई-ग्रंथालये सुरू करण्यात आली असल्याचे सांगितले. येत्या २६ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत माझ्या नावापुढे एक क्रमांक लिहून बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन आमदार डावखरे यांनी केले.