अलिबाग, (धनंजय कवठेकर) : पुणे-आळंदी येथून अलिबाग येथे समुद्र पर्यटनास आलेल्या ५ जणांपैकी समुद्रात पोहण्यासाठी गेलेला १ तरुण बुडाल्याची घटना गुरुवारी १३ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. अविनाश शिंदे (२७ रा आळंदी, मूळ औरंगाबाद) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. जीवरक्षक यांनी अविनाश याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला आहे. अविनाश हा आपल्या चार मित्रांसह पुणे आळंदी येथून अलिबाग मध्ये गुरुवारी १३ जून रोजी पर्यटनास आले होते. आळंदी येथे एका कंपनीत सर्वजण काम करत आहेत.
अलिबाग समुद्र किनारी आल्यानंतर अविनाश हा इतर मित्रांना किनाऱ्यावर ठेवून एकटाच समुद्रात पोहण्यासाठी गेला. समुद्रातून आपल्या मित्रांना हात करत होता. मात्र काही क्षणात तो नाहीसा झाला. पावसाळी वातावरण असल्याने समुद्र खवललेला आहे. त्यामुळे पाण्याचा अंदाज आला नाही. अविनाश दिसत नाही म्हणून किनाऱ्यावरील जीवरक्षक यांना माहीती दिली. त्यांनतर त्वरित जीवरक्षक हे जॅकेट घेऊन समुद्रात उतरले.
मात्र अविनाशचा शोध लागला नाही. अलिबाग पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले होते. समुद्राला भरती लागत असल्याने अविनाश शोध घेण्यात अडचण येत आहे. अविनाश यांच्या नातेवाईक यांना झालेल्या घटनेबाबत माहिती दिली असून ते अलिबागकडे येण्यास रवाना झाले आहेत. पावसाळ्यात समुद्रात पोहण्यासाठी जाण्यास बंदी असतानाही अनेकजण हे धाडस करून नाहक आपला जीव गमावत आहेत.